पोहाळवाडीत ‘नो’ कोरोनाग्रस्त ! अफवा पसरवाल तर याद राखा...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

पन्हाळा तालुक्‍याच्या पोहाळवाडीपैकी मुसलमानवाडीतील बरेच ग्रामस्थ नोकरी व व्यवसायनिमित्ताने आखाती देशांसह पुणे, मुंबई, ठाणे आदी महानगरांत वास्तव्यास आहेत. परदेशातील काही कोरोनाग्रस्त गावी परतल्याची अफवा पसरवली होती.

बाजार भोगाव (कोल्हापूर) - पोहाळवाडी (ता. पन्हाळा) येथे कोरोनाग्रस्त रुग्ण नसल्याची खात्री झाली असून अफवा पसरविल्याबद्दल कळे पोलिसांनी एकाला सक्त ताकीद दिली आहे. दरम्यान, पुणे, मुंबई, ठाणे येथून परतलेल्यांच्या हातावर होम क्वारंटाईन शिक्का मारला असून त्यांनी घराबाहेर न पडण्याच्या सूचना येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. लता सरोळे यांनी दिल्या आहेत.

अफवा पसरविणाऱ्याला पोलिसांची सक्त ताकीद

पन्हाळा तालुक्‍याच्या पोहाळवाडीपैकी मुसलमानवाडीतील बरेच ग्रामस्थ नोकरी व व्यवसायनिमित्ताने आखाती देशांसह पुणे, मुंबई, ठाणे आदी महानगरांत वास्तव्यास आहेत. परदेशातील काही कोरोनाग्रस्त गावी परतल्याची अफवा पसरवली होती. दरम्यान, वैद्यकीय यंत्रणेमार्फत घरोघरी सर्व्हे सुरू आहे. बाहेरून आलेल्यांना चौदा दिवस वेगळे राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. बाजार भोगावच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. लता सरोळे व पोलिस अधिकाऱ्यांनी प्रमुख ग्रामस्थांशी चर्चा करून कोरोनाबाबत काळजी घेण्याचे आवाहन केले. घरातूनच नमाज पठण करावे. होम क्वारंटाईनचा शिक्का असलेल्यांसह पुण्या-मुंबईहून परतलेल्यांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवालदार रघुनाथ यादव, अशोक निकम यांनी केले. सरपंच शमीम मोकाशी, पोलिस पाटील शबाना मोकाशी, माजी सरपंच रंगराव चौगले, बशीर शेख, ग्रामसेवक दीपक इंगवले उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police have strongly warned one about the rumors in kolhapur