राज्यात दिवसभरात १३ जणांचा मृत्यू; नव्या ११३ रुग्णांची भर

corona
corona

मुंबई - राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. गेल्या २४ तासांत १३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर ११३ रुग्णांची नव्याने भर पडली आहे. यामुळे राज्यातील रुग्णसंख्या ७४८ झाली आहे तर आतापर्यंत ५६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. 

आज झालेल्या मृत्यूंपैकी ८ जण मुंबईतील, ३ जण पुण्याचे तर प्रत्येकी एक रुग्ण कल्याण-डोंबिवली आणि औरंगाबाद येथील आहे. 

कस्तुरबा रुग्णालयात डोंबिवली येथील एका ६७ वर्षीय महिलेचा शनिवारी संध्याकाळी मृत्यू झाला. मात्र, तिला मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजार होते. कस्तुरबा रुग्णालयात एका ६४ वर्षीय पुरुषाचा काल रात्री मृत्यू झाला. नायर रुग्णालयात एका ६२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. मुंबईतील केईएम रुग्णालयात ६० वर्षीय पुरुषाचा आज पहाटे मृत्यू झाला. यापैकी एकानेही परदेश प्रवास केलेला नव्हता. 

कस्तुरबा रुग्णालयात ५२ वर्षीय पुरुषाचा काल रात्री मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता. मात्र, त्याला उच्च रक्तदाब , मधुमेह या आजारासोबत तो एचआय व्ही बाधितही होता. केईएम रुग्णालयाच ७० वर्षीय महिलेचा काल रात्री मृत्यू झाला. तिला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडाचा जुनाट आजार होता त्यामुळे ती डायलिसीसवर होती. चेंबूर येथील खाजगी रुग्णालयात ५५ वर्षीय पुरुषाचा काल रात्री मृत्यू झाला. तो टॅक्सी ड्रायव्हर असल्याने अनेकदा तो प्रवासी वाहतुकीसाठी विमानतळावर येत- जात असे. कस्तुरबा रुग्णालयात ७७ वर्षीय पुरुषाचा काल पहाटे मृत्यू झाला. त्याला उच्च रक्तदाब , मधुमेह हे आजार होते. चेंबूर येथील खासगी रुग्णालयात ८० वर्षीय पुरुषाचा काल पहाटे मृत्यू झाला. या रुग्णाला मधुमेह, उच्च रक्तदाब, अपस्मार अशा व्याधी होत्या. त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झालेला होता. कोरोना बाधित रुग्णाची निकट सहवासीत असलेल्या ६० वर्षीय महिलेचा काल मध्यरात्री पुण्याच्या ससून रुग्णालयात मृत्यू झाला. तिला मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजारही होते. औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज एका ५८ वर्षाच्या बॅंक अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचा त्रास होता. नजीकच्या काळात मुंबई वगळता त्यांनी कोठेही प्रवास केलेला नव्हता. यातील एकाही रुग्णाने परदेश प्रवास केला नव्हता. 

१४,८३७ जणांचे नमुने निगेटिव्ह 
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १६ हजार ८ नमुन्यांपैकी १४ हजार ८३७ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह तर, ७४८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ५६ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ४६ हजार ५८६ व्यक्ती घरगुती विलगीकरणात असून ३१२२ जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. 

निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशिदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि  महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी सात जण कोरोना बाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी २ जण पुणे ,पिंपरी चिंचवड आणि नगर भागातील आहेत तर एक जण हिंगोलीतील आहे. तर त्यांच्या निकटसहवासितांपैकी ५ जण पिंपरी चिंचवड येथे कोरोना बाधित आढळले आहेत. 

क्लस्टर कंटेनमेंट 
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अमलात आणण्यात येत आहे. मुंबई मनपा क्षेत्रात यासाठी ५१९ पथके काम करत आहेत. पुणे महानगरपालिका क्षेत्रात ४३९ पथके कार्यरत आहेत. नागपूर मनपा मध्ये २१० पथके घरोघर सर्वेक्षणाचे काम करत आहेत तर नवी मुंबई मनपा क्षेत्रात १९६ नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. राज्यात या प्रकारे एकूण ३०७८ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी १० लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे. 

पुण्यात १०३ रुग्ण 
पुणे शहर आणि जिल्ह्यात २६ दिवसांमध्ये १०३ रुग्ण आढळले. पुण्यात एका दिवसात २१ रुग्णांची नोंद झाली. या सर्व रुग्णांना विलगीकरण कक्षात दाखल करून ठेवण्यात आले, असल्याचेही आरोग्य खात्यातर्फे सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com