Coronavirus : राज्यात सोशल मीडियावरील पोस्टप्रकरणी २०० जणांवर गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 April 2020

वादग्रस्त पोस्ट काढण्यासाठी कायदेशीर नोटीस
महाराष्ट्र सायबरने विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून वादग्रस्त पोस्ट काढून टाकण्याकरीता आता नोटीसा बजावल्या आहेत. पोलिसांच्या या रोखठोक कारवाईची इंटरनेट कंपन्यांनी गांभीर्याने दखल केली आहे. त्यानुसार आतापर्यंत अनेक वादग्रस्त पोस्ट काढून टाकण्यात आल्या आहेत.

पुणे - लॉकडाउन सुरू असतानाही सोशल मीडियावर कोरोना किंवा अन्य विषयांबाबत खोट्या बातम्या, चुकीची माहिती व अफवा पसरविण्याची खुमखुमी काही कमी होण्याचे चिन्हे दिसेनात. अशी खुमखुमी असणाऱ्यांविरूद्ध महाराष्ट्र सायबरने कंबर कसली आहे. आतापर्यंत राज्यातील सुमारे २०० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये कोरोनाबाबत खोट्या बातम्या, अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध ६८ गुन्हे दाखल असून ३७ जणांना अटक करण्यात आली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने तसेच लॉकडाउनच्या काळात खोटी माहिती रोखण्याचेही पोलिसांपुढे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सायबर विभागाने सोशल मीडियावर खोटी माहिती पसरविणाऱ्यांविरुद्ध थेट कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सायबर पोलिसांनी आतापर्यंत सोशल मिडियाशी संबंधित विविध कारणांनी १९६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तसेच प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ३७ जणांना अटक केली आहे. खोट्या बातम्या, अफवा  पसरविणाऱ्यांचा शोधही पोलिसांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे. तसेच एकूण नोंदविलेल्या प्रकरणामध्ये ८८ प्रकरणे सोशल मीडियावर द्वेषयुक्त भाषण पसरविण्याशी संबंधित आहेत.

आकडेवारी
१८२ - खोट्या बातम्या, अफवा प्रकरणी दाखल गुन्हे
८८ -  द्वेषयुक्त भाषणाची प्रकरणे 
३७ - अटक करण्यात आलेले आरोपी
११४ - अद्याप ओळख न पटलेल्या आरोपींची संख्या
३२ - इंटरनेटवरून काढलेल्या वादग्रस्त पोस्ट

अशी घ्यावी खबरदारी
आलेली माहिती, व्हिडिओ, बातम्या पुढे पाठविताना सत्यता पडताळा.
खोट्या बातम्या, चुकीची माहिती, अफवा न पसरविता त्याची साखळी तोडा.
खोटी माहिती अफवा पसरविणाऱ्यांना समज द्या.
फेक मेसेज, व्हिडीओ, माहितीबाबत तत्काळ पोलिसाना माहिती द्या.

सोशल मीडियावर खोट्या बातम्या, चुकीची माहिती, अफवा पसरविणे हा कायद्याने गुन्हा आहे. समाजात चुकीचा संदेश जाऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्‍यता होती, त्यामुळेच अशा वापरकर्त्यांविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने थेट कारवाईला सुरुवात केली आहे. 
- डॉ. बालासिंग राजपूत, पोलिस अधीक्षक, महाराष्ट्र सायबर पोलिस.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 200 people crime by social media wrong post in state