Coronavirus : कमी दरात अन्नधान्य पुरवण्याचा प्रयत्न - छगन भुजबळ

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 April 2020

३०० कोटींची आवश्‍यकता
राज्य सरकार दरमहा ७ कोटी १७ हजार शिधापत्रिकाधारकांना सुमारे ३ लाख ८३ हजार मेट्रिक टन इतके अन्नधान्य पुरवले जाते. हे वितरण राज्यातील एकूण ५२ हजार ४२४ रेशन दुकानांतून अल्पदरात होते. राज्यातील सर्व केसरी शिधापत्रिकाधारकांना कमी दरात रेशन देण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्यातील ३ कोटी शिधापत्रिकाधारकांना फायदा होईल. त्यासाठीचा खर्च राज्य सरकार करणार असून दरमहा सुमारे ३०० कोटी रुपयांच्या निधीची आवश्‍यकता असेल, असेही भुजबळ यांनी सांगितले.

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी शनिवारी अन्न व नागरीपुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी भेट घेतली. यावेळी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून राज्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती पवार यांना दिली. तसेच राज्यातील ३ कोटी केशरी शिधापत्रिकाधारकांना कमी दरात अन्नधान्य उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असल्याचेही भुजबळ यांनी स्पष्ट केले. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करत केशरी शिधापत्रिकाधारकांना सरसकट रेशनचे धान्य देण्याचा निर्णय घेण्याच्यादृष्टीने पवार यांनी चर्चा केली. भुजबळ म्हणाले, की ग्रामीण भागात साधारणपणे ४९ हजारापेक्षा कमी आणि नागरी भागात साधारणपणे ५९ हजारापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या केशरी शिधापत्रिकामधील प्राधान्यक्रम लाभार्थ्यांना २ रुपये किलो दराने तांदूळ आणि ३ रूपये दराने गहू मिळतो. मात्र यापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना  रेशनच्या धान्याचा लाभ मिळत नाही. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच नागरिकांना मदत करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार सरसकट सर्व केशरी शिधापत्रिका धारकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे मिळणाऱ्या धान्याचा कमी दरात लाभ देण्यात यावा यासाठी प्रयत्न आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempts to provide food grains at lower rates chhagan bhujbal