Coronavirus : दिवसभरात राज्यात सात रुग्णांचा मृत्यू; कोरोनाबाधितांची संख्या ८६८

Corona-in-Maharashtra
Corona-in-Maharashtra

पुणे - राज्यात सोमवारी १२०  नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ८६८  झाली आहे. तसेच, करोना बाधित ७  रुग्ण मृत्यूमुखी पडल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.  

राज्यात झालेल्या मृत्यूपैकी ४ रुग्ण मुंबईतील असून, नवी मुंबई, ठाणे, वसई विरार येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे खात्यातर्फे सांगण्यात आले. 

मुंबई येथील बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात ४१ वर्षीय पुरुषाचा रविवारी मृत्यू झाला. त्याला अतिरिक्त मद्यपानामुळे यकृताचा आजारही होता शिवाय तो अपस्माराचा रुग्ण होता. बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातील  ६२ वर्षीय पुरुषाचा ४ एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्याला उच्च रक्तदाब, पॅरालिसिस हे आजारही होते. तसेच, मुंबईतील ८० वर्षीय पुरुष, तर नवी मुंबईतील ७२ वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मुंबईतील रुग्णाला उच्च रक्तदाब होता.

तर नव्यामुंबईतील रुग्णाला मधुमेह आणि हृदयरोग होता. नायर रुग्णालयात नालासोपारा येथील ९ महिन्यांच्या गरोदर मातेचा (वय ३० वर्षे) मृत्यू ४ एप्रिलला संध्याकाळी झाला. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान आता झाले. सेंट जॉर्ज रुग्णालयात ४ एप्रिल रोजी संध्याकाळी ५२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडयात त्यांनी राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्याला भेट दिली होती.

त्यांना दोन वर्षापासून मधुमेहाचा आजार होता. महानगरपालिकेच्या बांद्रा येथील भाभा रुग्णालयात आज सकाळी अंबरनाथ येथील ५० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. या रुग्णाने उत्तर प्रदेश मध्ये प्रवास केला होता आणि त्याला मधुमेहाचाही त्रास होता. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५२ झाली आहे. 

१५ हजार ८०८ निगेटिव्ह
राज्यातील वेगवगेळ्या रुग्णालयांमधून आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या १७ हजार ५६३ नमुन्यांपैकी १५ हजार ८०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर, ८६८ रुग्णांना कोरोना झाल्याचे निदान करण्यात आले. आतापर्यंत ७० करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३२५२१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून तीन हजार ३४९८  जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. 

निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशीदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी ८ जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी २ जण पुणे ,पिंपरी चिंचवड आणि नगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण हिंगोली आणि वाशीम मधील आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com