Coronavirus : राज्यात कोरोनामुक्तीचा दर १४ टक्के

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 April 2020

कोरोनामुक्त रुग्णांचे वाढते प्रमाण
कोरोनाबाधीत रुग्णाचे १४ दिवस संस्थात्मक विलगीकरण केले जाते. त्यासाठी सरकारी रुग्णालये, महापालिकेचे दवाखाने आणि खासगी रुग्णालयांची मदत घेण्यात येत आहे. कोरोनाच्या संसर्गानंतरही प्रकृती स्थिर असलेले, तसेच इतर कोणतेही आजार नसलेल्या रुग्णांना फक्त विलगीकरण कक्षात दाखल करून त्यांच्यावर उपचार केला जातो. या उपचारांना प्रतिसाद देत चौदा दिवसांमध्ये त्यांना झालेला विषाणूंचा संसर्ग बरा होतो. त्यानंतर २४ तासांमध्ये त्यांचे दोन नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवितात. ते निगेटिव्ह आल्यास ते कोरोनामुक्त होतात. निरोगी व्यक्ती म्हणून ते रुग्ण विलगीकरण कक्षातून बाहेर पडतात. अशा रुग्णांचे प्रमाण राज्यात १४ टक्के आहे.

मृत्यूदरापेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक
पुणे - राज्यात कोरोनाच्या संसर्गामुळे चार टक्के रुग्णांचा मृत्यू झाला असला तरीही त्यापेक्षा जास्त दहा टक्के जास्त म्हणजे १४ टक्के कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. राज्यात शनिवारी सकाळपर्यंत सहा हजार ८१७ कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद झाली आहे.

प्रत्येक संशयित रुग्णाचा शोध
कोरोनाबाधीत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाचा कसून शोध घेतला जात आहे. त्यांना १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवले जाते. कोणतीही लक्षणे नसली तरीही त्यांच्या घशातील द्रव पदार्थाचे नमूने तपासण्यासाठी प्रयोगाशाळेत पाठविले जातात. त्यांचा प्रयोगशाळेतील अहवाल निगेटीव्ह आल्यास त्यांना घरातच विलगीकरणाचा सल्ला दिला जातो. मात्र, झोपडपट्टीतील नागरिकांसाठी आता बहुतांश शहरांनी अशा संशयित रुग्णांना १४ दिवस ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते.

मृत्यूचे प्रमाण ४ टक्के
राज्यात कोरोनाचा मृत्यूदर चार टक्के आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांपेक्षा त्यातून खडखडीत बरे होणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याचे सार्वजनिक आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीच्या विश्लेषणावरून स्पष्ट होते.

साडेपाच हजार रुग्ण उपचाराखाली 
राज्यात आतापर्यंत निदान झालेल्या सहा हजार ८१७ रुग्णांपैकी ३०१ (४ टक्के) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील वेगवेगळ्या ३१ जिल्ह्यांमधील ९५७ (१४ टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, उर्वरित पाच हजार ५५९ रुग्णांवर (८२ टक्के) वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronation release rate in the state is 14 percentage