बाबासाहेबांना यंदा घरातूनच अभिवादन करा; मान्यवरांकडून आवाहन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 April 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत्या 14 एप्रिल रोजी आहे. एरवी ही जयंती धूमधडाक्यात साजरी होते. परंतु यंदा कोरोनाच्या  संकटामुळे या जयंतीवर मर्यादा आल्या आहेत. राज्यात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. तसेच सार्वजनिक कार्यक्रमांवर ही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. रस्त्यांवरील वाहतूकही थांबविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला घरीच अभिवादन  करून जयंती साजरी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

पुणे - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त यंदा सार्वजनिक कार्यक्रम टाळून त्यांच्या प्रतिमेला घरोघरी अभिवादन करून जयंती साजरी करावी, असे आवाहन विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत्या 14 एप्रिल रोजी आहे. एरवी ही जयंती धूमधडाक्यात साजरी होते. परंतु यंदा कोरोनाच्या  संकटामुळे या जयंतीवर मर्यादा आल्या आहेत. राज्यात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. तसेच सार्वजनिक कार्यक्रमांवर ही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. रस्त्यांवरील वाहतूकही थांबविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला घरीच अभिवादन  करून जयंती साजरी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. 
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले,"शहरातील यंदाची परिस्थिती वेगळी आहे.

नागरिकांचे आरोग्य आपल्याला राखायचे आहे. त्या मुळे बाबासाहेबांची जयंती आपण गर्दी न जमवता साजरी करू. नागरीकांनी घरीच बाबासाहेबांना अभिवादन करावे, अशी माझी विनंती आहे."

याबाबत पोलिस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे म्हणाले, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सर्वच नागरिकांच्या मनात अपार प्रेम कायम आहे. कोरोनाच्या संकटामुळे यंदा अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला नागरिकांनी घरोघरी अभिवादन करावे. कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देणे उचित ठरणार नाही." 

आमदार शरद रणपिसे म्हणाले,"कोरोनाचे यंदा आलेले संकट लक्षात घेऊन सार्वजनिक कार्यक्रम टाळले पाहिजे. बाबासाहेबांनी गौतम बुद्धांचे तत्वज्ञान भारतीयांच्या घराच्या दरवाजापर्यंत, आणून दिले आहे. त्याचा अभ्यास करणे वाचन करणे, सध्या गरजेचे आहे." बाबासाहेबांनी समाजाला नवी दिशा देताना आरोग्याची काळजी घेण्यासही सांगितले आहे, त्याची आपण अंमलबजावणी केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक अशोक धिवरे म्हणाले, "बाबासाहेबांच्या जयंतीला समारंभाचे स्वरूप देण्याची आवश्यकता नाही. बाबासाहेब हे विचारांचे प्रतीक आहे, त्यांना समर्पित होण्यासाठी त्यांच्या साहित्याचा अभ्यास करणे, त्यांच्या पुस्तकांमधील उतारे मुलांना वाचून दाखवणे, त्यांची संसदेमधील गाजलेली भाषणे मुलांना ऐकविणे गरजेचे आहे. ही जयंती विचारांनी साजरी करायची वेळ आता आली आहे. कारण या पुढच्या काळात विचारांचा लढा हा अधिक तीव्र होणार आहे, त्या साठी आपण तयारी केली पाहिजे."  कोरोनामुळे यंदा बाबासाहेबांची जयंती आपण घरी बसून कुटुंबियांसह साजरी करावी, असे आवाहन त्यांनी केले.  

कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष आणि भाजपचे कार्यकर्ते सुनील माने यांनी देखील डॉ. आंबेडकर  जयंतीनिमित्त नियोजित रथयात्रा सोहळा रद्द करून कोरोनाबाबत जागरूकता करण्यावर भर दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus dr babasaheb ambedkar birth anniversary avoid public problems