चिंताजनक : राज्यातील कोरोनाबाधित 4 हजार 200वर; दिवसभरात 552 नवे रुग्ण

टीम ई-सकाळ
Monday, 20 April 2020

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 72,023 नमुन्यांपैकी 67,673 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनाकरता निगेटिव्ह आले आहेत.

मुंबई Coronavirus : गेल्या दोनतीन दिवसांत राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने दिलासादायक चित्र निर्माण झाले होते; मात्र रविवारी राज्यात तब्बल 552 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील रुग्णांचा आकडा चार हजाराच्या वर गेला आहे.

बातम्या ऐकण्यासाटी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, आज दिवसभरात 12 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 507 कोरोनाबाधित रुग्ण आजारातून बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले. राज्यात आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील 6, मालेगाव येथील 4; तर सोलापूर 1 आणि जामखेड (अहमदनगर) येथील एका रुग्णाचा समावेश आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 4 पुरुष; तर 8 महिला आहेत. आज झालेल्या 12 मृत्यूंपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 6 रुग्ण आहेत; तर 5 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत; तर एक रुग्ण 40 वर्षांखालील आहे. त्यामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 223 झाली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 72,023 नमुन्यांपैकी 67,673 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 4200 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्‍लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्‍लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 368 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 6359 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 23.97 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. दरम्यान, आजपर्यंत 507 रुग्णांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 87,254 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 6,743 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus maharashtra updates 4 thousand 200 patients