राज्यात संचारबंदी ; जिल्ह्यांच्या सीमाही बंद 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 24 मार्च 2020

राज्यात संचारबंदीची घोषणा करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘आपण आता अगदी कोरोना साथीच्या फैलावाच्या निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. कोरोनाचा प्रादुर्भाव जर आत्ताच रोखला नाही, तर जगात सुरू असलेले थैमान आपल्याकडेही होईल.’’

मुंबई -  कोरोनाच्या साथीचा फैलाव समूहपातळीवर पसरण्याच्या थोड्या अलिकडच्या टप्प्यावर असताना मुंबई आणि पुण्यातील शहरी नागरिकांनी घराबाहेर पडून गर्दी करून वाहतूक कोंडी होण्यापर्यंतचा बेजबाबदारपणा दाखविल्यानंतर राज्य सरकारला कठोर पावले उचलत राज्यभरात संचारबंदी नाइलाजाने लागू करावी लागत असल्याची घोषणा आज सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. राज्यात शहरांमध्ये काही जिल्ह्यांपर्यंत असलेल्या या साथीचा फैलाव इतरत्र होऊ नये, यासाठी राज्यातील जिल्ह्यांच्या सीमादेखील बंद करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल ‘जनता कर्फ्यू’च्या केलेल्या आवाहनाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र, सायंकाळी डॉक्टर, पोलिस, महापालिका कर्मचाऱ्यांना धन्यवाद देण्यासाठी करण्यात आलेल्या टाळ्या आणि थाळीनादानंतर उत्साह संचारलेली जनता आज स्वैरपणे रस्त्यावर संचार करताना दिसत होती. मागच्या काही दिवसांमध्ये घरात बसलेली नोकरदार मंडळी रेल्वे, बस वाहतूक बंद असतानाही खासगी वाहनांनी घराबाहेर पडली. मुंबई, पुण्यात तर अनेक ठिकणी सकाळच्याा वेळेस वाहतूक कोंडी झाली होती. कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नव्याने भर पडत असताना रस्त्यावर झालेली गर्दी राज्य सरकारच्या चिंतेत भर घालणारी असल्यानेच अखेरीस संपूर्ण राज्यातील जनतेला आपापल्या घरात यापुढचा काही काळ लॉकडाऊन व्हावे लागणार आहे. 

राज्यात संचारबंदीची घोषणा करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘आपण आता अगदी कोरोना साथीच्या फैलावाच्या निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. कोरोनाचा प्रादुर्भाव जर आत्ताच रोखला नाही, तर जगात सुरू असलेले थैमान आपल्याकडेही होईल.’’ 

‘‘जनता कर्फ्यू’ चांगल्या पद्धतीने पाळण्यात आला. मात्र थाळ्या, घंटा वाजवणे हे कठीण परिस्थितीत सतत काम करणारे डॉक्टर, पोलिस, महापालिका कर्मचारी यांच्यासाठी होते. कोरोनाविरुद्धची लढाई अजून आपल्याला जिंकायची आहे. 

आशा, अंगणवाडी, होमगार्डस् यांनादेखील वैद्यकीय बाबतीत प्रशिक्षण देऊन तयार केले जात आहे. ज्यांना प्रादुर्भाव झालेला नाही त्यांनीदेखील काळजी घेणे खूप आवश्यक आहे. घरी विलगीकरण केलेल्यांनी सरकारच्या सूचना पाळायच्या आहेत, असेही उद्धव ठाकरे यांनी शेवटी स्पष्ट केले. 

मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे निर्णय 
- राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा बंद, खासगी वाहनांनीदेखील प्रवास करता येणार नाही 
- खासगी वाहनांना अत्यावश्यक कारणांसाठीच परवानगी 
- मुंबईत रिक्षामध्ये चालकाव्यतिरिक्त १ व्यक्ती, टॅक्सीमध्ये चालकाव्यतिरिक्त २ व्यक्ती 
- जीवनावश्यक वस्तू, औषधे, अन्नधान्य तसेच त्यांची ने-आण करणारी वाहने सुरू राहतील 
- पशुखाद्य मिळेल, पशूंचे दवाखानेही उघडे राहतील 
- कृषिमालाशी संबंधित वाहतूक सुरू राहणार 
- सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे पूर्णपणे बंद राहतील; मात्र पुजारी व मौलाना यांना नियमित पूजा करता येणार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: curfue maharashtra announced