Coronavirus : पोलिसांवरील ताण वाढवू नका - उच्च न्यायालय

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 April 2020

फिल्डवर उपस्थिती हवी
रुग्णालय कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. लॉकडाउन असताना सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची १०० टक्के उपस्थिती फिल्डवर असली पाहिजे. त्यांनी न्यायालयात उपस्थित राहण्याची आवश्‍यकता नाही, याची नोंद आरोपींनीही घ्यायला हवी. माहिती देण्यासाठी पोलिस न्यायालयात हजर राहू शकत नाहीत. लॉकडाउनच्या काळात जामीन मंजूर करणे तातडीच्या प्रकरणांत येत नाही, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

मुंबई - कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाउन असल्याने राज्यभरातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवणाऱ्या पोलिस यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. त्यामुळे न्यायालयीन कामे वाढवून पोलिसांवरील ताण अधिक वाढवू नका, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित प्रशासनाला दिले आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तुरुंगांतील आरोपींनी तातडीचे नसल्यास जामिनासाठी अर्ज करू नयेत. संपूर्ण देश संकटाचा सामना करत असताना कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याचे कर्तव्य पोलिस बजावत आहेत. संचारबंदी असूनही एकट्याने व समूहाने रस्त्यांवर फिरणाऱ्यांना समज देण्यासाठी पोलिसांना खबरदारी आणि संयमाने वागावे लागत आहे. कायदा-सुव्यवस्था राखताना त्यांना जीव धोक्‍यात घालावा लागत आहे. अशा काळात जामीन अर्ज दाखल करून पोलिसांना कामाचा आणखी ताण देऊ नका, अशी सूचना न्या. ए. एम. बदर यांनी केली.

फसवणुकीच्या आरोपात अटकेत असलेल्या सोपान लांजेकर याने जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने नामंजूर केला. सध्या बाहेरची परिस्थिती कठीण असून, जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात केल्या. त्यामुळे तुरुंगातून सोडल्यावर कैदी गावात कसे जाणार, हा प्रश्‍न आहे. या स्थितीत त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून आरोपीने तुरुंगात राहणेच योग्य आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आणि सुनावणी तहकूब केली.

मुंबईत ६०० पोलिसांची कोरोना चाचणी
मुंबई - मुंबई पोलिस दलातील ६०० अधिकारी व कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी ४२२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, अन्य अहवालांची प्रतीक्षा असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मुंबई पोलिस दलातील ६०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कस्तुरबा, सेव्हन हिल्स, लीलावती, बॉम्बे रुग्णालयांत चाचणी करण्यात आली. त्यापैकी ४२२ जणांना कोरोनाची बाधा झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्तव्यावर पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थंडी, ताप, सर्दी, खोकला, घशात खवखव अशी लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी. त्यांना विश्रांती घेण्यासाठी सुट्टी देण्यात येत असल्याची माहिती दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dont stress the police high court