राजकारण विसरून एकत्र येऊया ! 

अंकित काणे 
Thursday, 23 April 2020

सध्या "मनुष्याचा जीव की रोजगार' असा प्रश्न सर्व देशांना पडला आहे.या परिस्थितीत सध्या मला तरी लोकांमध्ये समजूतदारपणा दिसतोय.लोकं फार बाहेर पडत नाहीयेत,महत्त्वाच्या कामानिमित्त पडले तरी मास्क वापरताहेत

पृथ्वीराज चव्हाण ( माजी मुख्यमंत्री ) 
सध्या जगावर कोरोनाचे भयंकर संकट आहे. या आजारावर अजून तरी काही औषध नाही. त्यामुळे हा कोरोना होऊ न देणे एवढेच आपल्या हातात आहे. त्यासाठी शासनाने दिलेले नियम आपण सर्वांनी पाळले पाहिजेत. सध्या "मनुष्याचा जीव की रोजगार' असा प्रश्न सर्व देशांना पडला आहे. या परिस्थितीत सध्या मला तरी लोकांमध्ये समजूतदारपणा दिसतोय. लोकं फार बाहेर पडत नाहीयेत, महत्त्वाच्या कामानिमित्त पडले तरी मास्क वापरताहेत, सुरक्षित अंतर पाळताहेत. पण अजूनही काही लोकांनी या कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेतले नाहीये, अशांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली तरच या कोरोनाला आपण अटकाव करू शकतो. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या महाराष्ट्रात परप्रांतातून आलेल्या मजुरांचा प्रश्‍न फार गंभीर आहे. त्या लोकांना शासन त्यांच्या पातळीवर मदत करत आहेच; पण सामान्य लोकंसुद्धा अशा गरजूंना स्वतःहून पुढे येऊन मदत करताहेत, जेवण देताहेत, आर्थिक हातभार लावत आहेत हे फार आशादायी चित्र आहे. आता सध्या आपल्या समोर वैद्यकीय आवाहन आहे. पण देशातील डॉक्‍टर्स आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींच्या मार्गदर्शनाने यातून आपण नक्कीच बाहेर पडू. पण हे संकट संपल्यानंतर संपूर्ण जगावर आणि पर्यायाने आपल्या देशावरही सर्वांत मोठे संकट आहे ते म्हणजे आर्थिक. या देशातील सर्व विचारवंतांनी, अर्थतज्ज्ञ आणि अभ्यासकांनी आता पुढे आले पाहिजे. विविध पक्षांच्या राजकीय मंडळींनीही आता राजकारण आणि पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे. सर्व पक्षीय अभ्यासू नेत्यांनी आणि तज्ज्ञ मंडळींनी यावर विचारमंथन करून जर नियोजन केले तर पुढे देशावर येणाऱ्या आर्थिक संकटाला आपण निश्‍चित तोंड देऊ शकू आणि यातून बाहेर पडून पुन्हा एकदा प्रगतीकडे वाटचाल करू शकू याचा मला विश्‍वास आहे. आता जगाचीच अर्थव्यवस्था कोलमडली आहे. मोठे आणि आपल्या पुढे असणारे देशही कोरोनाच्या संकटाने काही वर्ष मागे आले आहेत. या परिस्थितीत आपण जागतिक स्पर्धेला तोंड देतील अशा युवकांचे कौशल्य हेरून त्यांना तयार केले पाहिजे, शेतीचे नवीन तंत्र विकसित केले पाहिजे. आता देशातील युवकांच्या कल्पकतेला खूप वाव आहे. त्याचा त्यांनी योग्य वापर केला पाहिजे. 

या लॉकडाऊनमुळे मला तरी आयुष्यात पहिल्यांदाच इतका वेळ घरी थांबता आलाय. कधी दिल्ली, मुंबई तर कधी पुणे या सगळ्या प्रवासात कराडला घरी फार थांबणेच झाले नव्हते. पण आता मात्र वेळ मिळाला आहे. त्यात वाचन करतोय. बऱ्याच काळापासून राहिलेले लिखाण पूर्ण करतोय. उद्याच्या अर्थव्यवस्थेच्या सबलीकरणासाठी अभ्यास आणि लेखन सुरू आहे. सोशल मीडियावरही वेळ घालवतोय. इंटरनेटवर काही महत्त्वाच्या डॉक्‍युमेंटरी बघतोय. रोज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी आणि अधिकारी मंडळींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतोय, सूचना देतोय. या सगळ्यातून थोडासा वेळ मिळाला तर एखादा चित्रपटही बघतोय. या सगळ्यात दिवस कधी संपतो तेच लक्षात येत नाही. 

शब्दांकन ः- अंकित काणे 
उद्याच्या अंकात- अनिल अवचट (लेखक, सामाजिक कार्यकर्ते) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: forget politics come together fight corona