नाती खुलवूया अन चांगल्या आयुष्याला सुरूवात करूया ! 

अनिल अवचट (लेखक, सामाजिक कार्यकर्ते) 
Friday, 24 April 2020

लॉकडाऊनकडे लिखाणाची मिळालेली संधी म्हणून पाहतोय कित्येक महिन्यात मी काही लिहील नव्हतं.ते लिहिण्यासाठी आता मला छान वेळ मिळालाय अशी संधी मिळणार नाही आता मिळाली आहे तर तिच्याकडे सकारात्मकतेने पाहूया

आपण सर्वांनीच या कोरोनाला आधी फार गांभीर्याने घेतले नाही. मला तरी ही एक छोटीशी साथ आली आहे, असं वाटतं होतं. पण, दिवस जसे-जसे पुढे जाऊ लागले, तसे या कोरोनाने आपले गंभीर रूप दाखवायला सुरुवात केली. आता मात्र शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे, घरात राहून आपल्या आवडीच्या गोष्टी करणे एवढेच आपल्या हातात आहे. अनेकांना सामाजिक काम करायची इच्छा असते, पण ते कसे व कुठे करावे?, हे लक्षात येत नाही. अशा सर्वांसाठी ही योग्य वेळ आहे. आपल्या आजूबाजूला अडचणीत असलेल्या लोकांना आपण आता मदत करू शकतो. रोजच्या धावपळीत अनेकांशी संवाद साधायचा राहून जातो, विशेषतः नवरा-बायकोमधील संवाद कमी झाला आहे. पालक आणि मुलांमधील गप्पाही कामाच्या धावपळीत थांबल्या आहेत. तो "संवाद' या निमित्ताने वाढवूया. आपल्या माणसांची विचारपूस करूया. अशी संधी आपल्याला पुन्हा-पुन्हा मिळणार नाही. आता मिळाली आहे तर तिच्याकडे सकारात्मकतेने पाहूया आणि तिचा चांगला वापर करूया. नाती खुलवूया आणि नव्याने एका चांगल्या आयुष्याला सुरुवात करूया. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

मी तर या लॉकडाऊनकडे लिखाणाची मिळालेली संधी म्हणून पाहतोय. कित्येक महिन्यात मी काही लिहील नव्हतं. ते लिहिण्यासाठी आता मला छान वेळ मिळालाय. सध्या ज्ञानेश्‍वरांवर लिखाण करतोय. बऱ्याच दिवसांपासून माझे स्नेही आणि कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव यांच्या जीवनावर लेखन करण्याचे माझ्या मनात होते, ते सुरू केले आहे. सामाजिक कृतज्ञता निधीसाठी "लग्नाची बेडी' हे नाटक आम्ही केलं होतं. त्यात निळू फुले, श्रीराम लागू, तनुजा ही कलाकार मंडळी होती. त्या नाटकाचे अनुभव लिहून काढतोय. जे-जे राहून गेलं होत, ते सगळं करतोय. "ओरिगामी' हा तर माझा आवडता विषय. त्याचे वेगवेगळे प्राणी तयार करतोय, घरच्यांसोबत वेळ घालवतोय. वाचन करतोय आणि एकंदरीतच अशाप्रकारे दिवस आनंदात घालवतोय. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(शब्दांकन ः अंकित काणे) 
उद्याच्या अंकात ः प्रवीण दीक्षित (निवृत्त पोलिस महासंचालक) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown is seen as an opportunity to write