कोरोनासोबत वादळी पाऊस, गारपिटीचे संकट; जाणून घ्या राज्यातील नुकसान

कोरोनासोबत वादळी पाऊस, गारपिटीचे संकट; जाणून घ्या राज्यातील नुकसान

पुणे : राज्याच्या विविध भागात गुरूवारी (ता.२६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वादळी वारे, मेघगर्जना, विजां, गारपीटीसह पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. दुपारनंतर ढग दाटून येत पडणाऱ्या पावसाने काढणीस आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी, रब्बी पिके, कांदा, टोमॅटोसह भाजीपाला पिके, द्राक्ष, आंबा, काजू बागांसह, चारा पिकांचे मोठे नुकसान झाले.

बुधवारी (ता.२५) मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्हा आणि शहराच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. मावळ तालुक्यातील पुसाणे,  चांदखेड भागात वादळी पावसाने पिकांचे नुकसान झाले. कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा तालुक्यातील माजगाव परिसरात वादळी वाऱ्यासह धुव्वाधार  पाऊस झाला. सातारा जिल्ह्यातील पाचगणी, तरडगाव, पिंपोडे, कास,  वाई,  लोणंद, ढाकणी, माण परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला.

- मेघगर्जना, विजांसह ‘पुर्वमोसमी’ची हजेरी
- गहू, हरभऱ्यासह रब्बी पिकाचे नुकसान
- कांदा, टोमॅटो, भाजीपाला पिकांना फटका
- द्राक्षे, आंबा, काजू बागांना तडाखा

नाशिक जिल्ह्यात तामसवाडी(ता.निफाड).येथे हलक्या सरी बरसल्या. द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात असताना झालेल्या पावसामुळे द्राक्ष उत्पादकांची धाकधूक वाढली आहे. नाशिक जिल्ह्यात नांदगाव बु, (ता.मालेगाव),  नाशिक शहरात, येवला शहर व परिसरात मेघगर्जनेसह हलक्या सरीं पडल्या. बेलगाव तऱ्हाळे (ता.इगतपुरी) परिसरात जोरदार वादळी वारा सह जोरदार पाऊस झाल्याने भाजीपाला, गहू, हरभरा, जनावराचा चारा, इतरही नुकसान झाले. शेणवड (ता.इगतपुरी) येथे पावसासोबत गारा पडल्याने हरभरा पिके पावसात भिजली आहेत. दारणा धरण परिसरात पाऊस पडला. 

नगर जिल्ह्यात श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी, कोपरगाव, राहता, तालुक्यात विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने मोठे नुकसान होणार आहे. श्रीगोंदा तालुक्यात अनेक गावात पावसाने पिकांचे नुकसान झाले. राहुरी तालुक्यातील पुर्व भागातील मुळाथडी परीसरातील पानेगाव, मांजरी, शिरेगाव, वळण,करजगांव, आदी गावात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाट पाऊस पडला. कोल्हार, ता.राहता येथे गारपिटीने झालेले द्राक्ष बागांचे नुकसान झाले. 

दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यीच्या चिपळूण तालुक्यात पावसाने हजेरी लावली. पूर्व विभागात  विजेच्या कडकडाटासह दुपारी पावसाला सूरवात झाली. पावसामुळे रब्बीच्या पिकांसह आंबा काजूवर पारिणाम होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे आधीच आंबा निर्यातीचा प्रश्न निर्माण झाला आहे अवकाळी पावसामुळे हापूस आंबा खराब होण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे येथील बागायतदार दुहेरी संकटात सापडला आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी जिल्ह्यात पुर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळल्या. औरंगाबादमधील वैजापुर,सोयगाव तालुक्यात पाऊस झाला. चेंडुफळ (ता. वैजापूर) परिसरात काढनीस आलेल्या गहू, कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. नांदर (ता. पैठण) येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वालसावंगी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. परभणी जिल्हातील सेलू शहर तसेच तालुक्यातील अनेक गाव शिवारात आज सायंकाळी मध्यम पाऊस झाला. विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, बुलडाणा जिल्ह्याच्या विविध भागात वादळीवाऱ्यासह पाऊस पडला. बुलडाणा जिल्ह्यातील खामगांव खामगांव तालुक्याच्या पारखेड गावात वादळी पावसाने प्रचंड नुकसान झाले. महादेव त्र्यंबकराव खराटे (रा. पारखेड) यांच्या मालकीची म्हैस विज पडून ठार झाली.

गुरूवारी (ता.२६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये) ः 
मध्य महाराष्ट्र ः शिराळा ४०, महाबळेश्वर, मिरज प्रत्येकी ३०, श्रीरामपूर, राहाता, गडहिंग्लज प्रत्येकी २०, संगमनेर, कोपरगाव, बोधवड, आजरा प्रत्येकी १०.
विदर्भ ः चांदूर रेल्वे, हिंगणा प्रत्येकी ३०, नेर, पारशिवनी, बटकुली, आर्वी, तिवसा, बाभुळगाव, नांदगाव काझी, कुही प्रत्येकी २०, काटोल, नागपूर, खारंघा, मातोळा, धामनगाव रेल्वे, रामटेक, मलकापूर, अमरावती, नंदुरा, खामगाव, पुसद, मौदा, दारव्हा, मोर्शी, कळमेश्वर, देवळी, चांदूरबाजार, आष्टी, सेलू़, जळगाव जामोद प्रत्येकी १०.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com