अनुभव सातासमुद्रापारचे... : सामाजिक मोकळीक संपली!

Bhakti-Thakur-Patkar
Bhakti-Thakur-Patkar

स्वीडन येथे अजून येथे संचारबंदी किंवा जमावबंदी नाही, पण येथील लोकही उगाच विनाकारण बाहेर भटकतानाही दिसत नाहीत. ही स्वयंशिस्त या समाजातच असल्याने असेल, पण अजूनही येथील व्यवहार सुरू दिसत आहेत. रस्त्यावर ट्राम व बस धावत आहेत. अर्थात ड्रायव्हरची एरवी उघडी केबीन सध्या बंद असते.

अगदी कालपरवापर्यंत आम्हाला स्वीडनमध्ये सामाजिक मोकळीक होती. स्टॉकहोम शहरात कोरोनाची साथ खूप जोरात आहे. मात्र आम्ही राहतो त्या गोथेनबर्गमध्ये अजूनतरी या साथीचा प्रभाव नाही. त्यामुळे येथे खूपच मोकळीक होती. या दोन दिवसापासून ही सामाजिक मोकळीक कमी होऊ लागली आहे. 

स्वीडनमध्ये फेब्रुवारीत विविध भागातील शाळांना वेगवेगळ्या वेळी एक आठवडा सुटी असते. तेव्हा काही कुटुंबे परदेशात सहलींसाठी जातात. या कुटुंबांपैकी काहींबरोबर कोरोना या देशात आला. साथीची जाणीव होताच वरच्या वर्गातील शाळांना व महाविद्यालयांना सुटी देण्यात आली. बहुतेकांनी घरातून काम करण्याला प्राधान्य दिले. सार्वजनिक समारंभ रद्द करण्यात आले. पण बाकीचे व्यवहार सुरूच ठेवण्यात आले. देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण येणार नाही अशा पद्धतीने कामे सुरू आहेत.

भारतासारख्या मोठ्या देशात या काळात घेतली जाणारी खबरदारी बातम्यांमधून समजत आहे. लोकसंख्याही मोठी आहे आपली. तरीही ज्या प्रकारे या साथीच्या प्रसाराला नियंत्रणात ठेवण्यात आले आहे, ते पाहता लॉकडाउनचे महत्त्व लक्षात येते.

येथे स्वयंशिस्त असल्याने कदाचित अजून सामाजिक मोकळीक मिळत असावी.
मात्र आता सामाजिक मोकळीक थोडी कमी होऊ लागली आहे. विमानसेवा नुकतीच बंद करण्यात आली आहे. मॉल किंवा अन्य दुकानात आता अंतर राखून उभे राहण्यास सुचवण्यात येत आहे. स्टॉकहोममध्ये लॉकडाउनसारखी परिस्थिती होती, ती कशी असू शकेल याचे काहीसे सूचन आता होऊ लागले आहे. येथे रहदारी अजून कमी झाली आहे, पण मास्क बांधून कोणी फिरत आहेत, असे दिसत नाहीत. मास्कचा तुटवडा आहे.

मास्क व सॅनिटायझर पहिल्यांदा रुग्णालयांना पुरवले जाते, मग आम्हाला मिळते. येथील आरोग्यविभागातील कर्मचाऱ्यांना कामावर उपस्थित राहता यावे यासाठी त्यांची लहान मुले ज्या नर्सरींमध्ये किंवा  प्रीस्कूलमध्ये असतील त्या  सुरू ठेवण्यात आल्या आहेत. 

येथील उद्योगव्यवसायावर सावट आले आहे, पण उद्योगाचे चक्र बंद पडू नये याचीही काळजी घेतली जात आहे. स्कॅन्डेनेव्हियन एअरलाइन्समधील अनेकांना नोकरी गमवावी लागली. अशांना आरोग्यसेवेचे प्रशिक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. नागरिकांच्या उपजीविकेचे मार्ग बंद पडू नयेत आणि अर्थव्यवस्था सांभाळली जावी, असा प्रयत्न केला जात आहे.
(शब्दांकन - संतोष शेणई)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com