राज्यात 212 डॉक्‍टरांचे विलगीकरण; वैद्यकीय सेवेवरील ताण वाढला 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 April 2020

कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याने किंवा बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने राज्यातील 212 डॉक्‍टरांना चौदा दिवस विलगीकरण कक्षात राहावे लागत आहे. त्याचा थेट फटका एक लाख 48 हजार रुग्णांना

पुणे - कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याने किंवा बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने राज्यातील 212 डॉक्‍टरांना चौदा दिवस विलगीकरण कक्षात राहावे लागत आहे. त्याचा थेट फटका एक लाख 48 हजार रुग्णांना बसणार असून, त्या रुग्णांना उपचारासाठी आता इतर डॉक्‍टरांकडे जावे लागल्याने वैद्यकीय सेवेवरील ताण वाढणार आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रुग्णसेवा करणारे डॉक्‍टर हे सध्या सर्वाधिक जोखमीचे काम करीत आहेत. सर्दी, खोकला, ताप अशी सामान्य लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना कोरोनाचा संसर्ग असण्याचा धोका असतो. अशा रुग्णांना तपासणाऱ्या आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांना कोरोना विषाणूंचा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे. तसेच, कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनाही संसर्गाची जोखीम पत्करावी लागते. या पार्श्‍वभूमीवर "इंडियन मेडिकल असोसिएशन'च्या (आयएमए) राज्यातील वेगवेगळ्या शाखांमधून संकलित केलेल्या माहितीच्या आधारावर राज्यातील 212 डॉक्‍टरांना विलगीकरण कक्षात ठेवले असल्याचा निष्कर्ष निघाला आहे. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

राज्यात वैद्यकीय सेवा करणाऱ्या खासगी डॉक्‍टरांबरोबरच सरकारी डॉक्‍टरांनाही "पर्सनल प्रोटेक्‍शन इक्विपमेंट' (पीपीई) किट मिळत नाहीत. सुरक्षेची कोणतीही सुविधा नसल्याने डॉक्‍टर दुय्यम दर्जाचे किट खरेदी करताना दिसत आहेत. त्यातून डॉक्‍टरांना संसर्ग होत आहे. कोरोनाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांना इतर रुग्णांपासून वेगळे केले जात नाही, याचाही फटका डॉक्‍टरांना बसत आहे. 
डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष, राज्य शाखा, आयएमए 
 

डॉक्‍टरांना होणाऱ्या संसर्गाचे परिणाम 
- एका रुग्णाला संसर्ग होतो तेव्हा त्याच्या कुटुंबातील आणि संपर्कातील व्यक्तींचे विलगीकरण होते. 
- एका डॉक्‍टरला संसर्ग होतो तेव्हा त्याने तपासलेल्या रुग्णांनाही विलगीकरण कक्षात ठेवले जाते. 
- एक डॉक्‍टर विलगीकरण कक्षात जातो, तेव्हा तो तपासत असलेल्या 50 रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळत नाही. 
- राज्यातील 212 डॉक्‍टर विलगीकरण कक्षात असल्याने दिवसाला 10 हजार 600 रुग्णांवर उपचार होत नाहीत. 
- राज्यभरात 212 डॉक्‍टरांचे 14 दिवस विलगीकरण केल्याने एक लाख 48 हजार 400 रुग्ण उपचारांपासून दूर राहणात आहेत. 
- या रुग्णांना सेवा देण्याचा ताण इतर डॉक्‍टरांवर वाढत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 212 doctors isolated state and Stress on medical care increased