पुणे : धनकवडीत पूर्ण बंद; पण...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 April 2020

दोन तास अत्यावश्यक सेवा सुरु

- बैठक घेऊन निर्णय

धनकवडी : कोरोना संसर्गामुळे लोक भेदरलेले असतानच भाजप आमदार भीमराव तापकीर यांनी स्थानिक सर्वपक्षीय नेत्यांना एकत्रित आणत धनकवडी आणि परिसर धनकवडी बंद पुकारला आहे. पण स्वस्त धान्य दुकाने वगळता सर्व अत्यावश्यक सेवा पुढील आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय तापकीर यांनी घेतला आहे.

जीवनाशवयक वस्तूंचे दुकाने बंद होणार असल्याने धनकवडीकरांमध्ये रविवारी गोधळ उडाला. मात्र, अशाप्रकारे बंद राहणार नाही, असे पोलिस सांगत आहेत. तर कोरोनाला रोखण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय, व्यापारी संघटना यांनी बंद पाळण्याचे निर्णय घेतल्याचे आमदार तापकीर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे धनकवडी येथील सर्व व्यवहार पुन्हा एकदा कडकडीत बंद राहतील. त्यात जीवनावश्यक म्हणजे किराणा दुकाने आणि भाजी विक्री ही बंद राहणार आहेत. 

कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक भर पडत असून, ही संख्या साडेपाचशेपर्यंत पोचली आहे. शहरातील त्या-त्या भागांतील कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, 'सील' आणि संचारबंदीचा उपाय केला गेला आहे. तरीही रुग्ण वाढत असल्याने पुणेकरांत प्रचंड भीती आहे. त्यावर महापालिका आणि जिल्हा प्रशासन उपाय करीत असतानाच आमदार तापकीर यांनी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला कोणतेही कल्पना न देता धनकवडी आणि परिसर बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे.

आमदारांच्या या भूमिकेनंतर रविवारी काही किराणे दुकाने आणि भाजीपाला विक्रेत्यांना दुकाने बंद करायला भाग पाडले. धनकवडी बंद राहणार असा मसेज व्हायरल झाल्याने धनकवडीकराच्या चिंतेत भर पडली आणि गोंधळही उडाला. यासंदर्भात पोलिसांची संपर्क केला. मात्र धनकवडीतील अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे त्यांनी संगितले.

दोन तास अत्यावश्यक सेवा सुरु

धनकवडीमध्ये पूर्णपणे बंद राहणार हा मेसेज फेक आहे. संपूर्ण शहरात संचारबंदी लागू असून, अत्यावश्यक सेवा दोन तास सुरु राहणार आहेत, असे सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांनी सांगितले.

बैठक घेऊन निर्णय

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. याबाबत शनिवारी संध्याकाळी बैठक घेऊन आठ दिवस सर्व व्यापार बंद ठेवण्याचे ठरविलेले आहे. त्यासाठी लोकांना आवाहन केले आहे, असे आमदार भीमराव तापकीर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 8 days Bandh in Dhankawadi on Coronavirus Issue