coronavirus : कोरोनाच्या अत्यवस्थ रुग्णांसाठी अॅक्शन प्लॅन तयार; महापालिकेकडून कार्यवाही

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 April 2020

पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.शहरातील पेठांच्या भागात ही संख्या सर्वाधिक आहे.त्याबरोबरच उपनगरात देखील ही संख्या हळूहळू वाढू लागली आहे.

पुणे - शहराच्या सर्वच भागात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळत असल्याने अशा रुग्णांना जवळपासच्या परिसरात तातडीने उपचार मिळावेत, यासाठी महापालिकेकडून अॅक्शन प्लॅन तयार जात केला आहे. त्यासाठी महापालिकेने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातील शंभर बेड्‌सची किमान दोन रुग्णालय निश्‍चित करण्याचे काम सुरू केले आहे. या रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर, अतिदक्षता विभाग आणि डायलेसिसची सुविधा आहे, अशा रुग्णालयांना प्राधान्य देण्यात येत आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील पेठांच्या भागात ही संख्या सर्वाधिक आहे. त्याबरोबरच उपनगरात देखील ही संख्या हळूहळू वाढू लागली आहे. रुग्णांची वाढत्या संख्येमुळे डॉ. नायडू रुग्णालयाची क्षमता संपुष्टात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांच्या म्हणण्यानुसार, या आणि पुढील महिन्यापर्यंत रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून विविध उपयोजना राज्य सरकारबरोबरच जिल्हा आणि महापालिका प्रशासनाकडून हाती घेण्यात आल्या आहेत. त्याच एक भाग म्हणून गरज पडल्यास खासगी रूग्णालय ताब्यात घेण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने भविष्यात ही गरज लक्षात घेऊन एक अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. 

आणखी वाचा - उद्धवजी लोकांचे जीव वाचवा आणि जगण्याची साधनंही

त्यानुसार गरज पडल्यास महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील किमान दोन रुग्णालय ताब्यात घेता यावी. यासाठीची तयारी सुरू केली आहे. हे रुग्णालय किमान शंभर बेड्‌सचे असावे. तसेच रुग्णालयात अतिदक्षता विभाग, डायलेसिस, व्हेंटिलेटर आदी सुविधा असावी, असे निकष निश्‍चित केले आहेत. अशा रुग्णालयांची यादी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. 

तातडीने उपचार करणे होणार सोयीचे 
शहराच्या सर्वच भागात रुग्ण सापडत आहे. त्यामुळे रुग्णांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविताना त्यातून संसर्ग वाढू शकतो. त्याऐवजी ज्या क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत रुग्ण आढळतील, त्याच क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरातील अशा रुग्णालयात त्यांना दाखल करून तातडीने उपचार करणे सोयीचे जावे, हा देखील त्यामागे एक हेतू असल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action Plan prepared for Corona patients by pmc