सीओईपीकडून मेकॅनिकल व्हेंटिलेटरचे तंत्रज्ञान विकसित

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 April 2020

मॅकेनिकलचे प्रारुप तयार आहे. ससूनने त्यात किरकोळ बदल सूचविले आहेत. ते केल्यानंतर एखाद्या उद्योगाला हे तंत्रज्ञान हस्तांतर करून हवी तेवढी व्हेंटिलेटर तयार करता येतील. त्याची किंमत केवळ आठ ते दहा हजार असेल.
- डॉ. संदीप अनसाने, सहाय्यक प्राध्यापक, सीओईपी

पुणे - कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यातील डॉक्‍टर शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. मग त्यांच्या मदतीसाठी पुण्यातील संशोधक तरी कसे गप्प राहतील?... डॉक्‍टरांच्या मदतीला धावून जात पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सीओईपी) संशोधकांनी ससूनमधील डॉक्‍टरांच्या साथीने अगदी अल्पदरात उपलब्ध होईल असे मेकॅनिकल व्हेंटिलेटरचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

 बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात कोरोनाबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. मात्र रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्हेंटिलेटरची कमतरता जाणवू नये, यासाठी ससूनच्या डॉक्‍टरांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना एकत्रितपणे व्हेंटिलेटरचे तंत्रज्ञान विकसित करण्याकरिता विचारणा केली होती. त्यानंतर अवघ्या आठवडाभरात या महाविद्यालयातील प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थी यांनी दिवस रात्र राबून हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

मेकॅनिकल व्हेंटिलेटर असे या तंत्रज्ञानाला नाव देण्यात आले आहे. त्याची यशस्वी चाचणी आज ससूनमध्ये करण्यात आली. त्यात काही तांत्रिक बदल करून हे व्हेंटिलेटर विशेषत: कोरोना रुग्णांसाठी वापरले जाणार आहे. या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य असे की ते दवाखान्यांना अल्पदरात उपलब्ध होईल आणि त्यापासून इतर रुग्णांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्‍यता नाही.

सीओईपीचे संचालक डॉ. बी. बी. आहुजा यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक डॉ. संदीप अनासाने, स्वप्नील बुकशेटे, अभिजित भगत, सुधीर भादुरी आणि दीपक धीवार यांनी अथक परिश्रम घेऊन हा मॅकेनिकल व्हेंटिलेटर तयार केला आहे. त्याची रचना कशी असावी याबद्दल ससूनच्या डॉ. सोनाली साळवी आणि अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी मार्गदर्शन केले. त्याची प्राथमिक चाचणी घेण्यात आली असून, काही सुधारणा करून लवकच हे तंत्रज्ञान प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध होईल. डॉ. अनासाने म्हणाले, ‘‘व्हेंटिलेटरच्या प्रारुपाची प्राथमिक चाचणी घेतली आहे. रुग्णाच्या फुप्फुसाला आवश्‍यक हवेची घनता ही २०० एमएल ते ५५० एमएल या दरम्यान निश्‍चित करता येते. रुग्णाच्या श्वासोच्छ्वासाचे प्रमाण आवश्‍यकतेनुसार यात सेट करता येते. हे विकसित केलेले व्हेंटिलेटर एकावेळी एकाच रुग्णासाठी वापरले जाणार आहे. दुसय्‌ा रुग्णासाठी त्याचा वापर करताना त्यातील काही भाग हा बदलता येणार असल्याने त्यापासून इन्फेक्‍शनचा धोका नाही.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: COEP developed technology for mechanical ventilators