आषाढी वारीवर कोरोनाचे सावट

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 April 2020

संचारबंदीबाबत १४ एप्रिलनंतर काय निर्णय होतो, यावर वारीबाबत आळंदी देवस्थान, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, ऊर्जितसिंह शितोळे सरकार, चोपदार तसेच अन्य मानकरी, दिंडी संघटना एकत्रित निर्णय घेतील. परंपरेप्रमाणे वारीला माउलींच्या पादुका न्याव्याच लागतील. मात्र, सरकारचे आदेश पाळून आणि दिंडी समाज संघटनेशी विचारविनिमय करून नेमका निर्णय घेण्यात येईल.
- ॲड. विकास ढगे- पाटील, प्रमुख विश्‍वस्त, आळंदी देवस्थान

आळंदी - कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने केलेला लॉकडाउन आणि रुग्णांची वाढणारी संख्या पाहता यंदाच्या आषाढी वारीबाबतची वारकऱ्यांमध्ये संदिग्धता कायम आहे. कोरोनाची आगामी काळातील स्थिती, सरकारची भूमिका आणि देवस्थान, मानकरी, वारकरी संप्रदायाचे मत यावर या वारीचे भवितव्य असणार आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरवर्षी चैत्र शुद्ध दशमीला पंढरपूरमध्ये आळंदी संस्थान, सर्व मानकरी, दिंडी संघटना यांच्यात बैठक होऊन त्यात आषाढी पायी वारीचा कार्यक्रम निश्‍चित केला जातो. मात्र, यंदा जगभरात कोरोनाने हाहाकार माजविला असल्याने पंढरपूरची चैत्र वारी रद्द करण्यात आली. त्यामुळे पालखी सोहळ्याच्या नियोजनाची बैठकही रद्द झाली. वारीच्या नियोजनाचा कोणताही निर्णय न झाल्याने वारकऱ्यांमध्ये संदिग्धता आहे.

पंढरीची वारी ही वारकऱ्यांची साधना आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वारी करण्याची वारकऱ्यांची परंपरा आहे. यापूर्वी ब्रिटिश काळात आलेल्या कॉलरा आणि प्लेगच्या साथीमध्ये स्वरूप बदलून वारी झाली होती. मात्र, कोरोनाची स्थिती आटोक्‍यात न आल्यास चैत्र वारीप्रमाणे आषाढी वारी रद्द करण्याची वेळ येते की काय, अशा चिंता वारकऱ्यांमध्ये आहे.

पालखी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर म्हणाले, ‘‘कोरोनाचा संसर्ग आटोक्‍यात आल्यावर वारीबाबत निर्णय घेण्यात येईल. माउलींच्या पादुका परंपरेप्रमाणे पंढरपूरला न्याव्याच लागतील. मात्र, वारकऱ्यांची संख्या आणि सरकारचे आदेश यावर आषाढी वारीचा निर्णय अवलंबून राहील.’’

राजाभाऊ चोपदार म्हणाले, ‘‘देवस्थान आणि दिंडी समाज संघटना याबाबतचा अंतिम निर्णय घेतील. वारीला अद्याप अडीच महिन्यांचा कालावधी आहे.’’ दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष मारुती कोकाटे म्हणाले, ‘‘आगामी पंधरा दिवसांची परिस्थिती पाहून वारीशी संबंधित घटक एकत्रित निर्णय घेतील.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona shaft on the Aashadi wari