Coronavirus : पुणे : झोपडपट्ट्या बनल्या कोरोनाच्या उद्रेकाची ठिकाणे

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 April 2020

रहिवाशांच्या आरोग्याची काळजी घेणार - अग्रवाल
दाट लोकवस्त्यांमधील प्रामुख्याने झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील (एसआरए) घरे देण्याचे नियोजन झाले आहे. मात्र या ठिकाणच्या जुन्या रहिवाशांच्या आरोग्याची  काळजी घेतली जाईल, असे महापालिकेकडून सांगण्यात आले. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल म्हणाल्या, ‘शहराचा सर्व भाग सुरक्षित ठेवण्याचे उपाय करीत आहोत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, याकरिताच रहिवाशांना स्थलांतरीत करण्यात येणार आहे. मात्र; त्यामुळे इतरांना धोका होईल, असे नाही. त्याबाबत सर्व पातळ्यांवर खबरदारी घेत आहोत.’

पुणे - दाटवस्ती, आर्थिक परिस्थिती बेताची, अल्प शिक्षण, आरोग्य विषयाचे अज्ञान आणि छोट्या झोपडीत राहणारे आठ ते दहा जणांचे कुटूंब या व अशा अनेक कारणांमुळे शहरातील झोपडपट्ट्या कोरोनाच्या उद्रेकाची ठिकाणे बनू लागली आहेत. जीवघेणा उकाडा आणि हातावर पोट असल्याने घराबाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही, अशा अनेक गोष्टी तेथील उद्रेक नियंत्रित करण्यासाठी अडसर ठरत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यातील पहिला कोरोनाचा रुग्ण ९ मार्चला पुण्यात आढळला. त्यानंतर ५० दिवसांमध्ये पुण्यातील रुग्णसंख्येने एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे. रूग्ण वाढीचा मोठा वेग असलेला बहुतांश भाग हा शहरातील पेठा आणि झोपड्ड्यांचा असल्याचे दिसून आले आहे. सोसायटीतून सुरू झालेला हा विषाणू झोपडपट्ट्यांपर्यंत पोचला. नुसताच पोचला नाही, तर वेगाने त्याचा फैलाव होउ लागला असल्याचे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी नोंदविले. 

सोसायट्यांमध्ये उद्रेक नियंत्रित 
सुरवातीचे रुग्ण सिंहगड रस्त्याच्या परिसरातील सोसायट्यांमध्ये आढळले. त्यानंतर कोरेगाव पार्कसारख्या उच्चभ्रू लोकवस्तीत होते. वारजे-कर्वेनगर, औंध-बाणेर, कोथरुड-बावधन या भागांमध्ये मोठ्या संख्येने सोसायट्या आहेत. तेथील रहिवाशी लॉकडाउनमध्ये आपापल्या घरात थांबले आहेत.  त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या भागातील कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

एकेका घरात आठ-आठ रुग्ण 
सध्या जे रुग्ण आढळतात, त्यातील बहुतांश हे झोपडपट्ट्यांमध्ये रहाणारे आहेत. लॉकडाऊनमुळे बाहेर जाता येत नसले तरीही एकेका घरात आठ ते दहा लोकं रहात असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. भवानी पेठ, येरवडा, ताडीवाला रोड, कोंढवा, पर्वती दर्शन या भागातील रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. एका घरातील आठ-आठ लोक पॉझिटीव्ह येत असल्याचे निरीक्षणही आहे. त्यामुळे कोरोना निंयत्रणात झोपडपट्टी हे सगळ्यात आव्हान ठरले आहे. 

ही आहेत आव्हाने
दाटवस्तीचा भाग 
जीवनमानाचा दर्जा कमी असणे 
आरोग्यविषयी अज्ञान 
सामाजिक, आर्थिक स्थिती बेताची 
शिक्षणाचा अभाव 
सर्वेक्षणासाठी सरकारी यंत्रणांना होणारा विरोध 

उपाययोजना 
कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यावर भर 
रोगनिदान चाचण्या वाढविणे 
कंन्टेनमेंट झोनची काटेकोर अंमलबजावणी 
निर्जंतुकीकरण 
झोपडपट्टीतील संशयित लोकांचे विलगीकरण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Infection Increase in Slum Area in pune