पुण्याच्या दूध पुरवठ्यासंदर्भात महत्त्वाची बातमी; चेंडू अजित पवारांच्या कोर्टात!

टीम ई-सकाळ
Tuesday, 21 April 2020

आता तुम्हीच सांगा अशा अवेळी आम्ही दूध विकायचे कसे? असा सवाल राज्यातील खासगी व सहकारी दूध संघांनी केलाय.

पुणे Coronavirus : राज्य सरकारने  संचारबंदीतही अत्यावश्यक सेवा म्हणून दूध विक्री करण्यास परवानगी दिली आहे. पण, सध्या राज्यातील अनेक शहरांमध्ये दूध विक्रीसाठी पोलिसांकडून केवळ दोनच तास आणि तेही अवेळी दिले जात आहेत. आता तुम्हीच सांगा अशा अवेळी आम्ही दूध विकायचे कसे? असा सवाल राज्यातील खासगी व सहकारी दूध संघांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील तीन मंत्री आणि पुणे शहरातील तीन आयुक्तांना केला आहे. दूधाच्या विक्रीवरील निर्बंध त्वरीत मागे घ्यावेत, असे साकडेही या मंत्री आणि आयुक्तांना घातले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

वेळ बदलण्याची मागणी
या मागणीसाठी राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळ म्हस्के, खजिनदार डॉ. विवेक क्षीरसागर आणि सचिव प्रकाश कुतवळ यांनी अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार हे तीन मंत्री आणि पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड आणि पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम या तीन आयुक्तांना साकडे घातले आहे. पुणे शहरात दूध विक्रीसाठी काही ठिकाणी सकाळी दहा ते बारा तर, काही ठिकाणी दुपारी बारा ते दोन अशी वेळ देण्यात आलेली आहे. मुळात दूधाचे वितरण हे पहाटेपासून करावे लागते. त्यामुळे दूध विक्रीसाठी सकाळी सहा ते दहा किंवा सात ते अकरा आणि संध्याकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत करावी, अशी मागणीही या दूध कल्याणकारी संघाने केली आहे.या संघात राज्यातील सर्व सहकारी आणि खासगी दूध संघांचा समावेश आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ही तर अत्यावश्यक सेवा
दूध हे अत्यावश्यक सेवेत येत आहे. हल्ली लहान मुले, वयोवृध्द व ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती हे दूधावर अवलंबून असतात. त्यामुळे दूध विक्रीचा कालावधी केवळ दोन तासांचा केल्याने एकाचवेळी मोठी गर्दी होऊ लागली आहे. याउलट दूध विक्री दिवसभर चालू ठेवल्यास गर्दी होत नाही. त्यामुळे दूध विक्री पुर्वीप्रमाणे चोवीस तास चालू ठेवली तर दूधाच्या खरेदीसाठी गर्दी होत नसल्याचे पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे  (कात्रज डेअरी) डॉ. विवेक क्षीरसागर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus milk supply issue curfew situation Pune police