coronavirus: कोरोनामुळं डॉक्टरांची प्रॅक्टिसही बदलली; कन्सल्टन्सीची नवी आयडिया 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

कोरोनाचा संसर्ग टाळतानाच रूग्णांची गैरसोय होऊ नये याची दक्षता घेतली जावी तसेच रूग्णांना पूर्वीप्रमाणेच वैद्यकीय सेवा दिली जावी, अशा सूचना महापालिकेने केल्या आहेत.

पिंपरी - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शहरातील डॉक्टरांनी तातडीची सेवा वगळता दूरध्वनीवरूनच रूग्णांना वैद्यकीय सल्ले देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग टाळतानाच रूग्णांची गैरसोय होऊ नये याची दक्षता घेतली जावी तसेच रूग्णांना पूर्वीप्रमाणेच वैद्यकीय सेवा दिली जावी, अशा सूचना महापालिकेने केल्या आहेत. 

पिंपरी चिंचवड परिसरात होमिओपॅथी, अॅलोपॅथी, आयुर्वेदिक असे सुमारे दीड हजारांहून अधिक छोटे-मोठे दवाखाने आहेत. सध्या, सर्दी, खोकला आणि तापाचे रूग्णांची संख्या मुख्यत्वे दिसून येत आहे. त्याने, कोरोनाचाही संसर्ग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे, खबरदारी म्हणून डॉक्टरांनी स्वतःच्या दवाखान्याच्या वेळांत बदल केले आहेत. तर काही डॉक्टरांनी दूरध्वनीवरूनच रूग्णांना वैद्यकीय सल्ले देण्यास सुरुवात केली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पिंपरी चिंचवड शाखेचे सचिव डॉ.सुधीर भालेराव म्हणाले, "कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी डॉक्टरांकडे हॅजमॅट म्हणजे वैयक्तिक सुरक्षा कीट  (पीपीई) नाहीत. हे कीट केवळ मोठ्या रुग्णालयांच्या अतिदक्षता विभागा मधील डॉक्टर वापरतात. हे कीट सर्वत्र उपलब्ध नाहीत. त्यामुळे, डॉक्टरांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन रूग्णांना दूरध्वनीवरून वैद्यकीय सल्ले दिले जात आहेत. तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी डॉक्टर रूग्णांची तपासणी करत आहेत. दवाखान्यांमध्ये गर्दी झाल्यास कोरोनाचा धोका होऊ शकतो. यासाठी डॉक्टरांनी दवाखान्यात अत्यावश्यक रुग्णांना वेळ ठरवून द्यावी. दवाखान्यांबाहेर डॉक्टरांचे मोबाईल क्रमांकाचे फलक लावा." दूरध्वनीवरून वैद्यकीय सल्ले दिल्यावर त्यांना व्हॉट्स अॅप वरून अौषधांची चिठ्ठी पाठविली जात आहे. 

coronavirus : अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांना पोलिसांकडून मिळणार पास

दरम्यान, याबाबत, बोलताना पालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे म्हणाले, "पीपीई कीट सर्वांना उपलब्ध करून देणे अशक्य आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्याची खबरदारी घेतानाच रूग्णांची गैरसोय होणार नाही याची दक्षता डॉक्टरांनी घ्यावी. तसेच स्वतः चे दवाखाने पूर्वी प्रमाणेच चालू ठेवावेत, अशा सूचना आम्ही यापूर्वीच डॉक्टरांना दिल्या आहेत."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus pimpri chinchwad doctors telephonic consultation