पुणेकरांनो गाडी घेऊन बाहेर पडाल, तर पश्चाताप होईल; वाचा सविस्तर बातमी

टीम ई-सकाळ
Tuesday, 21 April 2020

पुण्यात  अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व वाहनांना शहरामध्ये वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.

पुणे Coronavirus : संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करीत विनाकारण किंवा किरकोळ कारणासाठी वाहने रस्त्यावर घेऊन येणाऱ्या नागरिकांची तब्बल २८ हजार २४५ हजार वाहने पुणे पोलिसांनी जप्त केली आहेत. संचारबंदी उल्लंघन प्रकरणी साडे नऊ हजार जणांवर कारवाई केली आहे, तर २९ हजार जणांना पोलिसांनी नोटीस पाठविली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात मागील काही दिवसांपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व वाहनांना शहरामध्ये वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. तसेच विविध पोलिस ठाण्यांकडून व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून नागरिकांना वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र अनेकांकडून पोलिसांच्या सुचनेकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनेकजण किरकोळ कामासाठी देखील आपआपली वाहने घेऊन रस्त्यावर येत आहेत. शहरातील अनेक भागात नागरिक सर्रासपणे फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांकडून २८ हजार २४५ हजार वाहने जप्त करण्यात आली. पोलिसांनी कात्रज, स्वारगेट, डेक्कन, पुणे स्टेशन,  हडपसर, बिबवेवाडी, चतु:श्रुंगी, सातारा रस्ता या ठिकाणी कारवाई करून २८ हजारावर वाहने जप्त केली आहेत.

पुण्याच्या इतर महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा 

पोलिसांकडून अधिकृत परवानगी घेतलेले व अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना वगळून पोलिसांनी आतापर्यंत ९ हजार ५२३ जणांवर कारवाई केली आहे. तर, संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी २९ हजार जणांना पोलिसांनी नोटीस पाठविली आहे. तसेच मास्क न परिधान करता फिरणाऱ्या ३७९ जणांवर कारवाई केली आहे, असे पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus pune curfew vehicle seized police