लढा कोरोनाशी : फक्त अकरा दिवसांमध्ये ससून होणार आयसीयू सज्ज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

कोरोना विषाणूंच्या उद्रेकाशी लढण्यासाठी ससून रुग्णालय अवघ्या अकरा दिवसांमध्ये अद्ययावत वैद्यकीय उपकरणांची सुसज्ज होणार आहे.

पुणे : कोरोना विषाणूंच्या उद्रेकाशी लढण्यासाठी ससून रुग्णालय अवघ्या अकरा दिवसांमध्ये अद्ययावत वैद्यकीय उपकरणांची सुसज्ज होणार आहे. येत्या 31 मार्चपर्यंत हे काम पूर्ण होऊन रुग्णसेवेसाठी रुग्णालय सज्ज असेल, असा विश्वास अधिकारी आणि रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला. युद्धपातळीवर उभारण्यात येणारे हे राज्यातील पहिले अद्ययावत अतीदक्षता विभाग ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात कोरोनाचा विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. एकट्या पुण्यात कोरोनाच्या दोन अत्यवस्थ रुग्णांवर वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांवर उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत अत्यवस्थ रुग्णांची संख्या वाढल्यास त्यांच्यावर वेळेच प्रभावी उपचार करण्याची यंत्रणा उभारण्यासाठी राज्य सरकारने युद्धपातळीवर उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ससून रुग्णलयात उभारलेल्या नवीन अकरा मजली इमारतीमध्ये प्राणवायूची पाईपलाइन आणि सक्शन काँम्प्रेसर या उपकरणांसाठी साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.

कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

50 खाटांचा अतिदक्षता विभाग
ससून रुग्णालयातील अकरा मजली इमारतीमध्ये 50 खाटांचा अतिदक्षता विभाग आणि 100 खाटांचा विलगिकरण कक्ष सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी या इमारतीमधील पाचव्या आणि सातव्या मजल्यावर ही सुविधा विकसित करण्यात येत आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे शरीराला प्राणवायू मिळत नाही. त्यामुळे रुग्णावर उपचारासाठी 32 अद्ययावत व्हेंटीलेटर आणि त्यासोबत माँनिटर खरेदी करण्यात आले आहेत. सरकारने यासाठी साडेसात कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्या पाठोपाठ सक्शन काँम्प्रेसर आणि आँक्सिजन पाईपलाइन यासाठी राज्य सरकारने साडेपाच कोटी रुपयांच्या निधीला तातडीने मंजूरी दिली. हे काम पुढील अकरा दिवसांमध्ये पूर्ण होऊन हा अतिदक्षता विभाग रुग्णसेवेसाठी सज्ज होणार आहे, अशी माहिती डाँ. हरीश ताटीया यांनी दिली. रुग्णांवर उपचारांसाठी लागणाऱया काँम्प्रेसर खरेदीसाठी अडीच कोटी रुपये आणि त्यानंतर उपकरणांसाठी पाच कोटी रुपयांचा निधीला मान्यता देण्यात आली आहेत. जीवरक्षक उपकरणांच्या मदतीने रुग्णांवर प्रभावी उपचार शक्य होणार आहेत. 

 

कोरोनाच्या प्रत्येक अत्यवस्थ रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी ससून रुग्णालय सज्ज होत आहे. अद्ययावत वैद्यकीय उपकरणे, तज्ज्ञ डाँक्टर आणि प्रशिक्षित पॅरामेडिकल स्टाफ आणि कर्मचारी या ससून रुग्णालयाच्या जमेच्या बाजू आहेत,
- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus pune sassoon hospital special icu ward eleven days