Coronavirus कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी "ती'नेच घेतला पुढाकार; 820 जणांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 April 2020

अशी आहे कामाची पद्धत 

 • वस्तीपातळीवरील लोकांच्या समस्या सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत पोचवणे 
 • धान्य योग्य दरात मिळण्यासाठी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा 
 • सीफारने वस्तीपातळीवरील केंद्राच्या मदतीने 312 बांधकाम मजुरांचे सर्वेक्षण केले. 
 • त्यातील 41% मजुरांची कुटुंबाची परिस्थिती कठीण 
 • या कामाशी 22 हजार कुटुंबे आणि 91 हजार नागरिक जोडले आहेत.

पुणे - कोरोना विरुद्धच्या लढाईचे सर्वांत भीषण परिणाम भोगावे लागत असतील, तर ते वस्त्यांमधील नागरिकांनाच. संचारबंदीच्या काळात उपासमारीची टांगती तलवार आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे आव्हान अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या नागरिकांचे मनोबल वाढविण्यासाठी आता "ती'नेच पुढाकार घेतला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

समुदाय आधारित प्रकल्पातून एकत्रित आलेल्या या स्त्रिया आपल्या वस्तीतल्या लोकांना सुरक्षिततेचा संदेश देत आहे. तसेच संचारबंदीच्या परिणामातून भेडसावणाऱ्या प्रश्नांतून मार्ग काढायला, लोकांचे मनोबल वाढवायला मदत करत आहेत. सेंटर फॉर ऍडव्होकसी अँड रिसर्च (सीफार) या संस्थेने वस्ती विकासाच्या कामासाठी तयार केलेल्या समुदाय व्यवस्थापन समितीतील 185 सदस्य, महिला आरोग्य समितीच्या 500 महिला, सहाय्य कक्षातील 125 सदस्य, आणि 10 आशा कार्यकर्त्या मिळून युद्धपातळीवर हे कार्य करत आहेत. 

यातल्याच एक आशा (नाव बदलले) या विश्रांतवाडीच्या रहिवासी आहेत. बत्तीस वर्षांच्या आशा स्वत: ब्रेस्ट कॅन्सरच्या रूग्ण आहेत, तर त्यांचे पती मधुमेह व टीबीचे उपचार घेत आहेत. त्यांना चौदा वर्षाचा एक मुलगा आहे. त्यांनीही स्वतःला या कामात झोकून दिले आहे. आशा म्हणाल्या,""संसर्ग रोखण्यासाठी जी प्राथमिक काळजी घ्यायची आहे, ती आम्ही लोकांना समजेल अशा प्रकारे समजून सांगतो आहोत. सुरक्षित अंतर राखायचे, हात धुवायचे हे खबरदारीचे मार्ग लोकांना पटवण्यात आम्हाला यश येत आहे.'' करोनाच्या आपत्तीमुळे त्यांची केमोथेरपीही पुढे ढकलावी लागत होती, अशा काळातच सदर अडचणी बाबत स्थानिक नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची मदत लाभली. 

  नागरिकांना दोन महिन्याचे धान्य दिले जाणार असल्याचे अन्न व पुरवठा विभागाने जाहीर केले असले तरीही केवळ अन्नसुरक्षा कायद्याखालील, सरकारी रेशनकार्डधारकांनाच हे धान्य मिळणार आहे. रेशनकार्ड नसलेल्यांची संख्या खूप मोठी आहे आणि त्यांना धान्य मिळले नाही तर उपासमारीला तोंड द्यावे लागेल.
  - आनंद बाखडे, राज्य प्रकल्प व्यवस्थापक, सीफार.


  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: coronavirus sifar institute pune awareness drive with women