Coronavirus: माणसाला लॉकडाउन; वनचरे झाली मुक्त 

ghorpad
ghorpad

लॉकडाउनचा परिणाम वनचरांवर कसा झाला आहे, हे शास्त्रीय निकष लावून बघण्यासाठी इला फाउंडेशनतर्फे एक प्रयोग हातात घेतला. त्यासाठी पुण्यालगतच्या टेकड्या व डोंगरांची निवड केली. उथळ पाणवठ्यांच्या ठिकाणी गेली पाच वर्षे "कॅमेरा ट्रॅप' उपकरणे वापरून उन्हाळ्यात कोणते प्राणी व पक्षी पाणी पिण्यासाठी येतात याचा अभ्यास करत आहोत. त्याच्या नोंदी ठेवत आहोत. हा अभ्यास वनविभागासोबत सुरू आहे. 
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरवर्षी पुण्याच्या आसपास आम्हाला बुलबुल, मैना, ब्राह्मणी मैना, कावळा (घर व डोम), कबूतर, होला, शिंपी, शिंजीर तांबट असे पक्षी सामान्यपणे पाणी पिताना आढळले. पण यात पाणवठ्यावर लॉकडाउनच्या काळात हे पक्षी तर होतेच, पण त्यांचे एकावेळी पाणवठ्यावर येण्याचे प्रमाणदेखील वाढले. पण त्याशिवाय फॅनटेल, निलांग (टिकेलचा नर्तक), स्वर्गीय नर्तक, टकाचोर, तितर, सातभाई, भारद्वाज असे व इतर अनेक पक्षी सहजपणे पाणवठ्यावर दिसू लागले आहेत. माणसाची हालचाल कमी झाल्यावर मोर पाणवठ्यावर आले. मुंगूस आणि घोरपडदेखील हजेरी लावून जाताना आढळले आहेत. पुणे शहरात प्राणी, पक्षी निर्धास्त आहेत.

सध्या ग्रामीण भागात तर फारच विस्मयकारक अनुभव आलेले आहेत. इला हॅबिटॅट, पिंगोरी व त्याचप्रमाणे पुरंदर तालुक्‍यात इला फाउंडेशनच्या अनेक स्वयंसेवी अभ्यासकांनी आपापल्या शेताजवळ पाणी ठेवून नोंदी घेण्याचा अभ्यास काही वर्षे सुरू ठेवला आहे. इला हॅबिटॅट येथे आम्ही एक "वॉटर होल' निर्माण केले आहे. लॉकडाउनच्या काळात खेडोपाडीदेखील माणसांचा वावर खूपच कमी झालेला आहे. उन्हाळ्याच्या सध्याच्या दिवसात पारा चाळीस अंशांवर गेला आहे. 

आमच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये दरवर्षी मोर, तितर, घोरपड, मुंगूस व चिंकारा हे सातत्याने अनेक वर्षे नोंदविले गेले आहेत. पण लॉकडाउनच्या काळात मात्र, गेल्या दोन आठवड्यांत चौशिंगा, चिंकारा, भेकर, खोकड, साळिंदर, घोरपड, रानडुक्कर, उदमांजर, मांजर (स्मॉल इंडियन सिव्हेट) तरस व अनेक वेळा बिबट्याचे कुटुंब पाणी पिताना चित्रबद्ध झालेले आहेत. एरवी माणसाच्या पाणवठ्यावर जवळ असूनदेखील हे वन्य प्राणी फिरताना दिसले नव्हते. पण माणसाची चाहूल नाहीशी झाल्यावर या वन्यप्राण्यांचा वावर त्यांच्या वावरांमध्ये लगेच सुरू झाला आहे. ससाणे, शिक्रा व गरुडदेखील पाणवठ्यावर हजेरी लावून जात आहेत. 

कोरोनाचा लगाम प्रथमच निसर्गाच्या फायद्याचा होताना पाहताना एकीकडे आनंद होत आहे. पण त्याच बरोबर माणसांना ज्या वेदनांना तोंड द्यावे लागते आहे ते पाहताना क्‍लेशदेखील होतात. आपण सध्या जे त्रास अनुभवतो आहोत ते आपले सोयरे वनचरे रोजच आपल्यामुळे अनुभवत होते याची जाणीव व भान कोरोनाचा लॉकडाउन संपल्यावर माणसाला होईल का? 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com