Coronavirus:स्थानिक संपर्कातून सर्वाधिक रुग्ण; पुण्यात कोरोनाचे 142 पैकी 122 रुग्ण परदेश दौरा न केलेले 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 April 2020

कोणताही परदेश दौरा न केलेल्या पुण्यातील 142 पैकी 122 रुग्णांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला आहे. परदेशातून जाऊन आलेल्या रुग्णांची संख्या फक्त 20 आहे. 

पुणे - कोणताही परदेश दौरा न केलेल्या पुण्यातील 142 पैकी 122 रुग्णांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला आहे. परदेशातून जाऊन आलेल्या रुग्णांची संख्या फक्त 20 आहे. 

पुण्यात सोमवारपर्यंत (ता. 6) कोरोनाचा संसर्ग झालेल्या 142 रुग्णांची नोंद झाली. त्याचे विश्‍लेषण महापालिकेतर्फे करण्यात आले. त्यातून हा निष्कर्ष निघाला असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात 9 मार्चला आढळलेले पहिले दोन रुग्ण हे दुबईला सहलीसाठी गेले होते. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांसाठी दुबईहून प्रवास करून पुण्यात आलेल्या आठ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यापाठोपाठ प्रत्येकी दोन रुग्ण अमेरिका आणि फिलिपिन्समधून आले होते. तर, अबुधाबी, थायलंड, जपान, नेदरलॅंड, स्कॉंटलड, आयर्लंड, ब्रिटन, अमेरिका आणि कतार येथून प्रत्येकी एक प्रवासी पुण्यात आला. या सर्व रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान राज्यातील उद्रेकाच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात झाले. त्यानंतर मात्र, त्यांच्याशी संपर्क आलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढत गेले. 

Coronavirus : कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यातील पेठांसह शहराचा काही भाग सील

कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये 92 पुरूष आणि 50 महिला आहेत. त्यातही 31 ते 40 वयोगटातील रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक असून, त्या खालोलाल 51 ते 60 वर्षाच्या वयोगटातील रुग्णांची संख्याही अधिक असल्याचेही समोर आले आहे. 

सर्वाधिक रुग्ण शहरातील 
सोमवारपर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेल्या 142 रुग्णांमध्ये 115 हे पुणे शहरात राहणारे नागरिक आहेत. पिंपरी चिंचवड भागातील 20 रुग्ण आहेत. बारामती, शिरुरसारख्या तालुक्‍यांमध्येही कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याचे यातून दिसते. ग्रामीण भागातील सात रुग्णांचा यात समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Most corona patients from local contacts in Pune