Coronavirus : मावळातील गुलाब उत्पादक हवालदिल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 एप्रिल 2020

नाणे मावळात दूध उत्पादक संकटात
करंजगाव - लॉकडाऊनमुळे मावळातील दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, लोणावळा आदी शहरी भागात मावळातील दूध विक्री प्रथमच बंद झाली आहे. अनेक खाजगी दूध संकलन केंद्रे ही बंद आहेत. इतर दूध संघ जास्तीचे दूध घेण्यास नकार देत असताना दुधाचे करायचे काय असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शंभर लिटर दूध असणाऱ्या शेतकऱ्यांचे दूध विक्री होत नसल्याने त्यांच्या डोळ्यांत पाणी येऊ लागले आहे. जीवनावश्‍यक वस्तू खरेदी करण्यासाठीही अनेकांना घराबाहेर पडता येत नाही. वाहतूक व्यवस्था ठप्प असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना कामशेतमध्ये येता येत नाही. परिणामी शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांनाही गॅस सिलिंडर, किराणा, पालेभाज्या आदींच्या खरेदीच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

टाकवे बुद्रुक - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व विमानसेवा बंद केल्याने मावळातील शेतकऱ्यांचा गुलाबाची विक्री ठप्प झाली आहे. त्यामुळे तालुक्‍यातील फूल उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मावळात सर्वाधिक गुलाबाचे उत्पादन घेतले जाते. मावळात अडीचशे हेक्‍टरवर पॉलिहाऊस आहेत. यामध्ये दोनशे पंचवीस हेक्‍टरवर गुलाबाचे उत्पादन घेतले जाते तर उर्वरित पॉलिहाऊमध्ये जरबेरा व भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. टाकवे, माऊ, कोंडीवडे, पारवडी, आंबळे, निगडे, किवळे, कशाळ, इंगळून, पवळेवाडी, वाहनगाव, कुणे, अनसुटे या परिसरात सुमारे शंभर एकरमध्ये गुलाबाचे उत्पादन घेतले जाते. मावळातून जपान, इंग्लंड, फ्रान्स, हॉलंड, ऑस्ट्रेलिया, दुबईत गुलाबाची सर्वाधिक निर्यात होते. तसेच भारतातील स्थानिक बाजारपेठांमध्येही येथून फुले जातात. 

जानेवारी ते व्हॅलेन्टाईन डेच्या दरम्यान बऱ्यापैकी फुलांना चांगला भाव मिळाला. तसेच स्थानिक बाजारपेठांमध्ये हंगाम सुरू होत असतानाच जगभरात हाहाकार माजविलेल्या कोरोना विषाणूमुळे सरकारने १७ मार्च रोजी बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश दिले. तसेच २२ मार्चपासून भारत लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे आंतरराज्यीय वाहतूक करणारी विमानसेवा व रस्ते वाहतूकही बंद करण्यात आली. त्यामुळे गुलाबविक्री ठप्प झाली.

संचारबंदीमुळे लग्नसराईचा हंगाम संपुष्ठात आला असून,  गुलाबाचे उत्पादन सध्या फेकून देण्याची वेळ उत्पादकांवर आली. त्यामुळे आंदर मावळातील फुल उत्पादक संघाचे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान दररोज होत आहे. 

कर्ज काढून शेतकऱ्यांनी पॉलिहाऊस उभारली आहेत. कोरोनामुळे बाजारपेठा बंद असल्याने गुलाबाची विक्री होत नसल्याने बॅंकेचे हप्ते भरायला शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. त्यामुळे सरकारने नुकसान भरपाई म्हणून द्यावी.
- विकास शहाजी पिंगळे, अध्यक्ष, गुलाब उत्पादक संघ आंदर मावळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer Rose Flower loss by lockdown