पुण्यात दिवसभरात चार रूग्णांचा मृत्यू; शहरात 55 नवे रूग्ण आढळले 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 April 2020

पुण्यात कोरोनाच्या चार रुग्णांचा बुधवारी बळी गेला असून, मृतांमध्ये 34 वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे. शहरातील एकूण मृत रुग्णांची संख्या 38 झाली आहे.

पुणे - पुण्यात कोरोनाच्या चार रुग्णांचा बुधवारी बळी गेला असून, मृतांमध्ये 34 वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे. शहरातील एकूण मृत रुग्णांची संख्या 38 झाली आहे. 
आज दिवसभरात नवे 55 रुग्ण सापडल्याने एकूण संख्या 377 पर्यंत गेली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिवाजीनगरमधील 34 वर्षांच्या पुरुषाला कोरोना झाल्याने त्याला 14 एप्रिलला रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी त्याचा मृत्यू झाला. त्याला अन्य आजार असल्याचेही निदान झाले आहे. 

पर्वतीतील 49 वर्षाच्या व्यक्तीला बुधवारी सकाळी दाखल करण्यात आले. त्यानंतर काही तासांतच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी स्पष्ट केले. त्यांना न्यूमोनिया होता. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गोखलेनगर येथील 63 वर्षाच्या पुरुषाच्या घशातील द्रव पदार्थाच्या नमुन्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना 13 एप्रिलला ससूनमध्ये दाखल केले होते. त्यांचा बुधवारी दुपारी मृत्यू झाला असून, त्यांना मधुमेह, व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. भवानी पेठेठेतील 73 वर्षाच्या महिलेचाही बळी गेला आहे. त्यांना मूत्रपिंडाचा आजार होता. 

घरोघरी जाऊन तपासणी 
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने महापालिकेने आणखी उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. ज्या लोकांना ताप, थंडी, सर्दी आणि खोकला आहे, अशा लोकांनी लगेच महापालिकेच्या रुग्णालयांत जाऊन तपासणी करण्याचे आवाहन महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी बुधवारी केले आहे. त्यासाठी सर्व दवाखाने आणि रुग्णालयांतील यंत्रणा सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याशिवाय घरोघरी जाऊनही मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four patients die in Pune & 55 new patients found in pune city

Tags
टॉपिकस