coronavirus: कलेतून दूर करा मानसिक कोंडमारा; "द आयडिया ट्री' उपक्रमाला जगातून प्रतिसाद

संतोष शाळिग्राम : सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 16 April 2020

कोरोनामुळे प्रत्येकाला सक्तीने "घरकैद' भोगावी लागते आहे ना?..यातून निर्माण होणारा मानसिक कोंडमारा दूर करायचाय?..त्यासाठीच चित्रकारांनी पुढाकार घेतला असून "द आयडिया ट्री'ही ऍक्‍टिव्हिटी सुरू केली आहे

पुणे - कोरोनामुळे प्रत्येकाला सक्तीने "घरकैद' भोगावी लागते आहे ना?... यातून निर्माण होणारा मानसिक कोंडमारा दूर करायचाय?... त्यासाठीच चित्रकारांनी पुढाकार घेतला असून "द आयडिया ट्री' ही ऍक्‍टिव्हिटी सुरू केली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चित्रकार अनुराधा ठाकूर यांनी विविध देशातील कलाकारांना इंटरनेटच्या माध्यमातून एकत्र आणत फेसबुकवर  "द आयडिया ट्री' हे पेज सुरू केले आहे. इन्स्टाग्रामवर याच नावाने ऍक्‍टिव्हिटी सुरू केली आहे. महाराष्ट्रासह बंगळूर तसेच अमेरिका, इटली, ऑस्ट्रेलिया देशांतून नागरिक त्यात सहभागी होऊ लागले आहेत. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

ठाकूर म्हणाल्या, ""घरात कोंडून राहिल्यामुळे आपल्या सहज प्रवृत्ती प्रवाही राहत नाहीत. त्यातून मानसिक कोंडमारा होत राहातो आणि अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून समाज माध्यमांद्वारे हा उपक्रम सुरू केला. त्यासाठी पुण्यातून प्रणील लासुरे, बंगळूरचे अविनाश देशमुख, मुंबईतून संस्कृती सेराव, नाशिकहून साक्षी चौधरी, अमेरिकेतून आसावरी कुलकर्णी आणि ऑस्ट्रेलियातून उर्वी करानी या कलाकारांची मला मदत मिळते आहे.'' 

कलेच्या मदतीने आपण मानसिक समस्यांवर मात करू शकतो. अनेक प्रयोगांनी हे सिद्ध झाले आहे. म्हणून लॉकडाउनच्या काळात प्रत्येकाला कलात्मक आविष्कार साकारता यावा, त्यातून घरामध्ये आनंदी आणि सर्जनशील वातावरण निर्माण व्हावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्याला महाराष्ट्रच नव्हे; तर जपान, अमेरिका आणि इटली या देशांतून प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. 

काय आहे ही ऍक्‍टिव्हिटी 
"द आयडिया ट्री' या उपक्रमात भाग घेण्यासाठी घराबाहेर जावे लागत नाही. घरातील वस्तूंचा जसे वर्तमानपत्र, रंग आदींचा वापर करून हस्तकला तयार करण्यास सांगितली जाते. यात घरीच हॅंडमेड पेपर बनविणे, त्याचे बाउल तयार करणे, वर्तमानपत्रांच्या कागदांचे पेन स्टॅंड, मोबाईल स्टॅंड आदी वस्तू तयार करून घेतल्या जातात. लहान-मुलांबरोबरच मोठी माणसेही यात भाग घेऊ शकतात, असे अनुराधा ठाकूर यांनी सांगितले. 

मानवाच्या काही सहज प्रवृती असतात, त्यांना रोजच्या जीवनातील वेगवेगळ्या कृतींमधून योग्य वाट मिळत जाते. पण ती मिळाली नाही, तर त्या साठून त्याचे मानसिकदृष्ट्या वाईट परिणाम होतात. कलेच्या अभिव्यक्तींमधून या सहजप्रवृतींना योग्य वाट मिळते. विचारांना सकारात्मक दिशा मिळते आणि स्वनिर्मितीचा आनंद तणाव कमी करतो. 
-अनुराधा ठाकूर, चित्रकार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good response from the world to The Idea Tree initiative