Coronavirus : किराणा मालाच्या भावात दहा टक्‍क्‍यांनी वाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

कांदा-बटाट्यासह फळांची मोठी आवक
मार्केट यार्डातील मुख्य बाजारात कांदा-बटाट्याच्या १६६ गाड्यांची आवक झाली. यामध्ये एकूण ७ हजार ८०० क्विंटल कांदा-बटाट्याची आवक झाली आहे. २५० गाड्यांमधून फळांची आवक झाली. यामध्ये एकुण ७ हजार ५०० क्विंटल मालाची आवक झाली. मोशीतील बाजारात १४१ गाड्यांची आवक झाली. यामधे एकुण ३ हजार ५०० क्विंटल मालाची आवक झाली. तर गूळ भुसार बाजारात २३५ गाड्यांमधून ४१ हजार २३३ क्विंटल मालाची आवक झाली.

मार्केट यार्ड - कोरोनाच्या धास्तीने माल वाहतुकीसाठी ड्रायव्हर व अन्य कर्मचारी मिळत नाहीत. वाहतुकदारांकडून माल वाहतुकीस टाळाटाळ केली जात आहे. परतीचे भाडेदेखील द्यावे लागत असल्याने वाहतूक खर्चात दुप्पट वाढ झाली आहे. यामुळे सध्या सर्वच किराणा मालाच्या भावामध्ये साधारणतः १० टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाल्याची माहिती दि पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गुलडेकडी येथील मार्केट यार्डातील भुसार विभागात महाराष्ट्रासह परराज्यातून मोठ्या प्रमाणात किराणा मालाची आवक होत असते. परंतु सध्या लॉकडाऊनमुळे सर्व हॉटेल, चहाच्या टपऱ्या बंद आहेत. यामुळे परराज्य व राज्यातील विविध भागातून माल घेऊन येणाऱ्या ड्रायव्हर, क्‍लिनर लोकांचे प्रवासा दरम्यान खाण्या-पिण्याचे प्रचंड हाल होत आहेत.

यामुळे माल वाहतुकीस ड्रायव्हर मिळत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तसेच मार्केट यार्डात माल घेऊन आल्यानंतर परत जाताना काहीच भाडे मिळत नाही. यामुळे सध्या माल वाहतुकदारांकडून दुप्पट भाडे आकारले जात असल्याचे ओस्तवाल यांनी सांगितले. 
या कारणांमुळे किराणा मालाच्या भावामध्ये साधारणतः १० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.

दरम्यान मार्केट यार्डात सर्व प्रकारचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. गुळ भुसार विभाग साप्ताहिक सुट्टी सोडून सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत चालू राहणार असल्याची माहिती ओस्तवाल यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grocery prices rise by ten percent by coronavirus