'हायर'कडून गरीब-गरजूंसाठी ७५० किट्सचे वाटप

नागनाथ शिंगाडे
Tuesday, 14 April 2020

- राज्यातील लॉकडाऊन वाढल्यानंतर गरीब कुटुंबांसमोर उपासमारीचे संकट उभे राहिले आहे.

तळेगाव ढमढेरे : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) एमआयडीसीतील हायर अप्लायन्सेस कंपनीतर्फे हातावरचे पोट असणाऱ्या मजुरांना अन्नाची भूक भागविण्यासाठी ७५० किट्स दिले आहेत. लॉकडाऊनच्या काळात गोरगरीब मजुरांना कंपन्यांनी मदत करावी, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे. त्यानुसार तत्काळ प्रतिसाद देत हायर ऍप्लायन्सेस (इंडिया) कंपनीने ७५० किट्स उपलब्ध करून दिली आहेत. 

राज्यातील लॉकडाऊन वाढल्यानंतर गरीब कुटुंबांसमोर उपासमारीचे संकट उभे राहिले आहे.  गरिब व गरजूंची भूक भागविण्यासाठी 'जगदंब प्रतिष्ठान तर्फे जास्तीत जास्त गरीब कुटुंबांना धान्य व जीवनावश्यक वस्तू देण्याचे‌ ठरवले आहे, त्यानुसार खासदार डॉ. कोल्हे यांनी धान्य किट्स उपलब्ध करून देण्याचे आवाहन विविध कंपन्यांना केले असून, तत्काळ प्रतिसाद देत रांजणगाव येथील हायर कंपनीने आज जीवनावश्यक वस्तूचे किट्स 'जगदंब प्रतिष्ठान'कडे सुपूर्द केले आहेत. यामध्ये गव्हाचे पीठ,  तांदूळ, डाळ, कुकिंग वॉईल, मसाला, साबण आदी आवश्यक वास्तूचा समावेश आहे. यावेळी कंपनीचे मुख्य प्रकल्प अधिकारी पंकज चावला, संचिता कुमार व  विकास जैन आदी उपस्थित होते. 

दरम्यान, कोरोनाची साखळी तोडू, माणुसकीची साखळी जोडू" या माझ्या आवाहनाला प्रतिसाद देऊन धान्य किट्स उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी हायर कंपनीचे विशेष आभार मानले असून, लॉकडाऊनच्या काळात माणसांमध्ये अंतर ठेवा, परंतु माणुसकीत अंतर पडू देऊ नका, असे आवाहन खासदार डॉ. कोल्हे यांनी केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Haier Company Provide 750 Kits to Peoples