Coronavirus : कोरोनाग्रस्तांना आरोग्य सेवा देणारी ‘सेविका’

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 April 2020

अशी केली त्यांनी कोरोनाग्रस्तांची सेवा

  • तपासणीसाठी रक्त, स्वॉब घेणे
  • इंजेक्‍शन देणे, सलाइन लावणे
  • डॉक्‍टरांसोबत तपासणीसाठी जाणे
  • जेवणाची आणि पाण्याची व्यवस्था पाहणे

अगदी पायापासून डोक्‍यापर्यंत झाकलं जाईल असं प्रोटेक्‍टिव किट घालणं... अन्‌ तेही काही मिनिटांसाठी नव्हे, तर तब्बल दहा-बारा तास अगदी ड्यूटी संपेपर्यंत...बरं हे किट एकदा घातलं की सारखं काढ-घाल करणं शक्‍य नसतं. त्यामुळे पाणी पिणं, काही खाणं जरा अवघडच, असा अनुभव कोरोनाग्रस्तांची प्रत्यक्ष सेवा करणारे घेत आहेत. 
त्यातील एक परिचारिका म्हणून सेवा करणाऱ्या सुवर्णा नाझरेकर.

बातम्या ऐकण्यासाटी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नाझरेकर या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल रूग्णालयात परिचारिका म्हणून गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ लागला, त्यावेळी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठीच्या अति दक्षता विभागात (आयसीयू) त्या काही दिवस कार्यरत होत्या. आता  त्यांच्यावर कोरोनाच्या प्राथमिक तपासणीसाठी येणाऱ्या 
रूग्णांच्या वॉर्डमधील जबाबदारी आहे. नाझरेकर म्हणतात, ‘रुग्णांची सेवा हिच खरी ईश्वर सेवा, असे मानत मी काम करत आहे. 

आतापर्यंत एचआयव्ही, कर्करोग, स्वाईन फ्लू अशा आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांची सेवा केली आहे. कोरोनाग्रस्तांची सेवा करण्याची इच्छा होती. आणि तीही संधी मिळाली. मात्र आता एकदा कामाला गेल्यावर पुन्हा घरी येईपर्यंत कोणाशीही संपर्क साधता येत नाही. प्रोटेक्‍टिव किट घालून तासन्‌ तास काम करावे लागत आहे. हे पीपीई किट सातत्याने काढ-घाल केल्यास कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्‍यता असते. म्हणूनच आपल्याला आणि आपल्यामुळे इतरांना कोरोना होऊ नये म्हणून अतिरिक्त खबरदारी घ्यावी लागते. कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्‍यात आणण्यात आपल्याला निश्‍चितच यश येणार आहे. आम्ही सदैव तुमच्या सेवेसाठी तप्तर आहोत, असे त्या म्हणाल्या.

स्वताच्या जिवाची पर्वा न करता, आम्ही सर्व रुग्णालयातील कर्मचारी तुमच्यासाठी सदैव तत्पर आहोत. यापुढेही २४ तास ड्युटीही लागण्याची शक्‍यता आहे. आणि आम्ही ती ही तुमच्यासाठी करू. पण तुम्हीही स्वतःची काळजी  घेतली पाहिजे.
- सुवर्णा नाझरेकर, परिचारिका

आम्‍हाला अवश्‍य कळवा...
कोरोनाविरोधातील लढाईत अनेक योद्धे आघाडीवर आहेत. त्‍यांची भूमिका वेगळी असली तरी ध्येय मात्र एकच आहे. अशा अापल्‍या ओळखीतील, पाहण्यातील योद्ध्यांची माहिती, छायाचित्रे, व्‍हिडिओ आमच्यापर्यंत अवश्‍य पोहचवा. आपला संपर्क क्रमांक द्यायला विसरू नका. 
आम्‍हाला इ-मेल करा.  editor@esakal.com


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health care worker for coronaaffected patient suvarna najharekar