Coronavirus : परदेशवारी करणाऱ्यांच्या कुटुंबीयांचीही चाचणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

असे आहे नवे धोरण

  • चौदा दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय प्रवास करणारे नागरिक आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींच्या स्वॅबची चाचणी
  • बाधित रुग्णांच्या संपर्कातील सर्व व्यक्ती आणि सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये लक्षणे दिसल्यास होणार चाचणी
  • हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांमध्ये लक्षणे आढळल्यास त्यांचीही चाचणी केली जाणार
  • ज्यांना होम क्वारंटाइनची सूचना करण्यात आली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही होम क्वारंटाइन राहण्याचे निर्देश.

पुणे - कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता, आता परदेशवारी करणाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचीही चाचणी घेण्यात येणार आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्यावतीने (आयसीएमआर) शुक्रवारी (ता. २०) कोरोना चाचणी संदर्भातील धोरणात बदल करण्यात आला आहे. यानुसार १४ दिवस ‘होम क्वारंटाइन’मध्ये असलेले नागरिक आणि त्यांचे कुटुंबीय ज्यांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळली आहेत, अशा नागरिकांच्या घशातील द्रवपदार्थाची चाचणी घेण्यात येणार आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगभरातील १८२ देश ‘कोविड- १९’ या विषाणूंमुळे प्रभावित झाले आहेत. देशातील कोरोना विषाणू प्रसाराचा पहिला टप्पा आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांमुळे सुरू झाला. त्यांच्या संपर्कात आलेल्या जवळच्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्यामुळे दुसऱ्या टप्प्याला देशात सुरुवात झाली. दिवसेंदिवस कोरानाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. याचा विचार करता ‘आयसीएमआर’च्यावतीने चाचणीसंदर्भातील धोरणांमध्ये बदल करत संसर्गाच्या सामाजिक प्रसाराची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. आवश्‍यकता भासल्यास किंवा तिसऱ्या टप्प्याची चाहूल वाटल्यास या धोरणात आवश्‍यक बदल करण्यात येईल असे कोरोनाविरुद्धच्या राष्ट्रीय कृती समितीच्यावतीने सांगण्यात आले आहे. या आधीही ९ आणि १६ मार्चला असे बदल करण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: health test of families living abroad