Coronavirus : होम क्वारंटाइन रूग्ण आढळला अन् मग...

प्रफुल्ल भंडारी 
शनिवार, 21 मार्च 2020

होम क्वारंटाइनची सूचना असतानाही मुंबईवरून गुलबर्गाकडे उद्यान एक्सप्रेसने निघालेल्या एका प्रवाशाला दौंड रेल्वे स्थानकावर उतरविण्यात आले.

दौंड (पुणे) : होम क्वारंटाइनची सूचना असतानाही मुंबईवरून गुलबर्गाकडे उद्यान एक्सप्रेसने निघालेल्या एका प्रवाशाला दौंड रेल्वे स्थानकावर उतरविण्यात आले. पूर्वसूचना देऊनही आरोग्य यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याने सदर प्रवासी पावणे दोन तास स्ट्रेचरवर होता.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये आणि प्रादुर्भाव वाढू नये याकरिता कतार येथून मुंबई विमानतळावर आलेल्या या प्रवाशाच्या हातावर मुंबई येथे होम क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात आला होता. दरम्यान, विमानतळावरून आलेला हा 28 वर्षीय तरूण आज (ता.21) साध्या तिकिटावर मुंबई-बंगळुरू उद्यान एक्सप्रेसच्या आरक्षित डब्ब्यातून प्रवास करीत होता. हातावर शिक्का असतानाही प्रवास करीत असल्याने उद्यान एक्सप्रेसमधील रेल्वे अधिकाऱ्यांनी त्याकडे चौकशी करून नियंत्रण कक्षाला कळविले. नियंत्रण कक्षाने त्या प्रवाशाला दौंड येथे उतरविण्याचे आदेश दिले.

दरम्यान दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी उद्यान एक्सप्रेस दौंड रेल्वे स्थानकावर दाखल होताच वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीनिवास यांच्या निरीक्षणाखाली त्याला उतरविण्यात आले. तो प्रवास करत असलेला डब्ब्यावर फवारणी करून त्यामधील प्रवाशांना अन्य डब्यांमध्ये हलविण्यात आले.  रेल्वे स्थानक व्यवस्थापक सॅम्यूएल क्लिफ्टन यांच्यासह लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी केली. 

पुढील तपासणी व उपचारांसाठी सदर प्रवाशाला पुणे येथे हलविण्याच्या सूचना डॅाक्टरांनी दिल्या. परंतु दुपारी एक वाजता आलेला सदर प्रवाशाला रूग्णवाहिका नसल्याने दुपारी दोन वाजून 50 मिनिटांपर्यंत स्ट्रेचरवर ठेवण्यात आले होते. दौंड येथील उपजिल्हा रूग्णालय व आपत्ती व्यवस्थापन कक्षात समन्वय नसल्याने पावणे दोन तास सदर तरूण रेल्वेच्या लिफ्टजवळ स्ट्रेचरवरच होता. रूग्णालयातून पुढील तपासणीसाठी त्याला पुणे येथे पाठविण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: home quarantine patient found in Railway