मानव सेवेतील लढवय्या : डॉ. सुधीर पाटसुते वाढवितात रुग्णांचे मनोधैर्य

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

आम्‍हाला अवश्‍य कळवा...
कोरोनाविरोधातील लढाईत अनेक योद्धे आघाडीवर आहेत. त्‍यांची भूमिका वेगळी असली तरी ध्येय मात्र एकच आहे. अशा अापल्‍या ओळखीतील, पाहण्यातील योद्ध्यांची माहिती, छायाचित्रे, व्‍हिडिओ आमच्यापर्यंत अवश्‍य पोहचवा. आपला संपर्क क्रमांक द्यायला विसरू नका. 
आम्‍हाला इ-मेल करा. editor@esakal.com

पुणे - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी घरात राहून आपण आपली आणि आपल्या कुटूंबियांची काळजी घेत आहोत. मात्र, अशा परिस्थितीत स्वत:च्या आरोग्याची पर्वा न करता काही लढवय्ये नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी धडपडत आहेत. त्यातील एक नाव म्हणजे महापालिकेच्या डॉ. नायडू संसर्गजन्य रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर पाटसुते.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रूग्णालयातील वीसहून अधिक डॉक्‍टरांसह परिचारिका, फार्मासिस्ट, स्वच्छता करणारे या जवळपास शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने डॉ. पाटसुते हे दिवसरात्र काम करून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वैद्यकीय उपचार करीत आहेत.

रुग्णालयातील उपचाराशी संलग्न गटात समन्वय साधत कोरोनाग्रस्तांची सेवा करण्याचे काम डॉ. पाटसुते करत आहेत. प्रत्यक्ष रूग्णालयात असताना तपासासाठी फेरी मारणे, डॉक्‍टरसह अन्य कर्मचाऱ्यांकडून कामाचा आढावा घेणे, कोरोनाग्रस्त रुग्णांची विचारपूस करणे आणि त्यांच्या वैद्यकीय अहवालाची सातत्याने माहिती घेत राहणे, हे डॉ. पाटसुते यांचे काम. ते करत असताना घड्याळाच्या काट्यावर कामाच्या तासांची मोजपट्टी होत असली, तरीही ते चोवीस तास सेवेत आहेत.

डॉ. पाटसुते हे मूळचे सांगली जिल्ह्यातील कासेगावचे असून, त्यांचे बालपण नाशिकमध्ये गेले. शिक्षणासाठी ते पुण्यात आले. पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले. नायडू रूग्णालयात ते गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहेत. 

'आताच्या परिस्थितीत आमची टिम चांगले काम करत आहे. त्याचे श्रेय हे टिममधील प्रत्येक कर्मचाऱ्यांचे आहे.,’’ अशा शब्दांत डॉ. पाटसुते यांनी भावना व्यक्त केल्या. डॉ. पाटसुते यांच्या पत्नी डॉ. सुचित्रा म्हणाल्या,"डॉ. पाटसुते अत्यंत समर्पित भावनेने वैद्यकीय सेवा करत असल्याचा अभिमान आहे.’

कोरोनाचा संसर्ग आटोक्‍यात आणण्याच्या कामात बाबांचा हातभार लागत आहे, त्याचा अभिमान आहे. यापूर्वी त्यांनी स्वाईन फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी महत्त्वाचे काम केले आहे. अशा परिस्थितीत काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. त्यांचे हे काम आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.
- पर्णवी पाटसुते, डॉ. सुधीर पाटसुते यांची कन्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Human service fighters dr sudhir patsupe