वैद्यकीय संशोधनात वाढ;कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 April 2020

वैद्यकीय शोधनिबंधाच्या संपादनाच्या वेळेत 49 टक्‍क्‍यांनी घट करण्यात आली असून, त्यामुळे प्रकाशनाचा वेगही दुपटीने वाढला आहे. प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधांच्या संख्येवरून हे विश्‍लेषण करण्यात आले आहे.

पुणे- कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावाबरोबरच त्यावरील वैद्यकीय शोधनिबंधांमध्येही अभूतपूर्व वाढ नोंदविण्यात आली आहे. वैद्यकीय शोधनिबंधाच्या संपादनाच्या वेळेत 49 टक्‍क्‍यांनी घट करण्यात आली असून, त्यामुळे प्रकाशनाचा वेगही दुपटीने वाढला आहे. जगातील प्रतिष्ठित 14 मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधांच्या संख्येवरून हे विश्‍लेषण करण्यात आले आहे. नेदरलॅंड येथील संशोधक सिर्जी होरबक यांनी सेंटर फॉर सायन्स ऍण्ड टेक्‍नॉलॉजी स्टडीजच्या डेटाच्या आधारे हे स्पष्ट केले आहे.

बातम्या ऐकण्यासाटी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जागतिक महामारीच्या काळात प्रथमतःच वैद्यकीय शोधनिबंधांमध्ये ही वाढ नोंदविण्यात आली आहे. विषाणूजन्य आजारांसाठी कोणतेही औषध लगेच येत नाही. त्यासाठी बऱ्याच कालावधीपर्यंत मूलभूत संशोधन करावे लागते. अशा कालावधीत तातडीने प्रकाशित होणारे वैद्यकीय संशोधन औषधे किंवा प्रतिजैविके विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. शोधपत्रिकांनी संपादनाचा वेग वाढावा म्हणून, तज्ज्ञांचे अवलोकन आणि चाचणीच्या पद्धतीत बदल केल्याचे निदर्शनास आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

महत्त्वपूर्ण निष्कर्ष
- कोविड-19च्या प्रसारादरम्यान चांगल्या दर्जाच्या शोधनिबंधात वाढ
- शोधनिबंध नोंदविणे, तपासणे आणि प्रकाशित करण्याच्या कालावधीत 49 टक्‍क्‍यांनी घट
- सरासरी 57 दिवसात शोधनिबंधाचे संपादकीय कामकाज पूर्ण.
- बहुतेक शोधपत्रिकांनी त्यांच्या प्रकाशन वेळेत 80 टक्‍क्‍यांनी घट केली
- वैद्यकीय क्षेत्र वगळता इतर क्षेत्रातील शोधनिबंधांचा वेग मंदावला

कोविड-19 संबंधित प्रकाशित शोधनिबंध
जानेवारी ः 3 टक्के
फेब्रुवारी ः 1 टक्के
मार्च ः 32 टक्के
16 एप्रिल पर्यंत ः 64 टक्के

- कोविड 19 संदर्भातील शोधनिबंधांची संख्या (14 शोधपत्रिका)
कोरोनाआधी (1 ऑक्‍टोबर 2019 पूर्वी) ः 270
कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर (1 जानेवारी ते 16 एप्रिल 2020 ) ः 259

कोविड-19 संबंधातील शोधनिबंधांची वाढती संख्या आणि त्याची आत्ताची गरज लक्षात घेता, प्रकाशनाचा वेगही वाढवावा लागेल. शोधपत्रिकेने जलद संपादनाचे काम हाती घेण्यात आले असून, 700 तज्ज्ञ शास्त्रज्ञांची अवलोकनासाठी नेमणूक करण्यात आली आहे. अवलोकनाची ही प्रक्रिया 24 ते 48 तासात पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- रॉयल सोसायटी ओपन पब्लिशिंग

मेडिकल जर्नल ऑफ ऑस्ट्रेलिया कोविड-19 विरुद्धच्या लढाईत आपल्या पातळीवर सहभागी झाले आहे. त्यासाठी सार्स-कोवीड-2 संदर्भातील शोधनिबंध दाखल करणे, त्याचे अवलोकन करून, प्रकाशित करण्याचा कालावधी घटविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. जेणेकरून नवीन विश्वासार्ह माहिती आणि विश्‍लेषण संशोधकांना उपलब्ध होईल.
- मेडिकल जर्नल ऑफ ऑस्ट्रेलिया


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in medical research coronas impact