Coronavirus : कोरोनासाठी पुण्यात स्वतंत्र रूग्णालय; सरकारचा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 April 2020

वीस हजार रूग्णांवर उपचार
कोविड-१९ च्या रूग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन पुढील काळात परिस्थिती चिंताजनक होऊ शकते. हा विचार करून अधिकाधिक रूग्णावर उपचार करणे शक्‍य व्हावे, या दृष्टीने विचार करून ही तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार किमान वीस हजार रूग्णांवर एकाचवेळी उपचार करता येतील. त्यासाठी लागणारे हॉस्पिटल, किमान सात ते आठ हजार व्हेंटिलेटर, अतिदक्षता विभाग एवढी यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुणे - पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा रुग्णांवर उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालय निर्माण करण्याच्या विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू झाला आहे. त्यादृष्टीने सरकारी आणि खासगी रुग्णालयांची माहिती घेण्यात येत आहे. त्यामध्ये ससून रुग्णालयाचाही समावेश आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबई आणि पुणे हे कोरोना उद्रेकाचे हॉटस्पॉट ठरले असून रुग्णांच्या संख्येचा आकडा वेगाने वाढत आहे. दगावणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे राज्य सरकारबरोबरच जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना अमलात आणल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून स्वतंत्र रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

पुण्या-मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमधील खासगी रुग्णालयांमध्येही करोनाबाधीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयांमध्ये स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापन केले आहेत. समान्य रुग्ण आणि कोविड-१९ विषाणूंचा ससंर्ग झालेले रुग्ण एकाच रुग्णालयात नको, असा विचार पुढे येत आहे. भविष्यातील रुग्णसंख्येचा विचार करून कोरोनाबाधीतांवर उपचार करणारे स्वतंत्र रुग्णालय असावे, असेही सार्वजनिक आरोग्य खात्यातील तज्ज्ञांचा प्रस्ताव आहे. स्वतंत्र रुग्णालयामुळे संसर्गचा धोका कमी होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे.

इटलीमध्ये एकाच रुग्णालयात इतर आणि कोरोनाच्या रुग्णांवर उपचार झाल्याचा प्रकार झाला असल्याचे अभ्यासातून समोर आले. ती चूक टाळण्यासाठी, तसेच या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकाच ठिकाणी कोविड-१९ बाधित रुग्णांवर उपचार करणे सोयीचे जावे. त्यासाठी स्वतंत्र हॉस्पिटल असावे, असा विचार पुढे आला.

त्यासाठी खासगी आणि सरकारी रुग्णालयाची माहिती घेतली जात आहे. त्यामध्ये ससून रुग्णालयाचा देखील समावेश आहे. या रुग्णालयातील अन्य आजाराचे रुग्ण दुसरीकडे हलविण्यात येऊन त्या ठिकाणी केवळ कोविड-१९ च्या रुग्णांसाठी ते रुग्णालय राखीव ठेवण्याचा विचार सुरू आहे. पुणे शहरातील ससून प्रमाणेच मुंबई विरार येथील एक रुग्णालय कोविड-१९ साठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Independent Hospital in pune for coronavirus government proposal