Coronavirus : कष्टकऱ्यांची भर उन्हात धान्यासाठी रांग; रोजगाराअभावी पैशांची चणचण

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 April 2020

कामगार वाहतूक; तीन जणांवर गुन्हा 
पुणे - संचारबंदीत कामगारांना कर्नाटकला घेउन निघालेला ट्रक बिबवेवाडी पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला. गस्तीवरील पोलिसांनी गुरुवारी (ता.२) विघ्नहर कॉलनी येथे ही कारवाई केली. राहुल जगताप असे चालकाचे नाव आहे. काम नसल्यामुळे ठेकेदार अरविंद पासलकर व रमेश जाधव यांनी कामगारांना घेऊन जाण्यास सांगितल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.

पुणे - लॉकडाऊनमुळे रोजगार बुडाला, पैसा संपत आला. रेशन दुकानात धान्य आल्याचा निरोप मिळताच कष्टकऱ्यांनी मोठी गर्दी केली. डोक्‍यावर तापलेला सूर्य असतानाही तीन तास रांगेत थांबून धान्य घेऊन, पुढच्या काही दिवसांची सोय करून ठेवली. हे चित्र सिंहगड रस्त्यावरील पानमळा येथील आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. कारखाने, बांधकाम साईट, शोरूम, दुकाने सर्व बंद आहेत. त्यामुळे रोजंदारीवर कामासाठी जाणाऱ्या कष्टकऱ्यांचे हाल सुरू आहेत. या काळात धान्य कमी पडू नये म्हणून सरकारने पुढील तीन महिन्यांचे धान्य गरीबांना दिले जाणार असल्याचे जाहीर केले आहे. तेव्हापासून रेशन दुकानांकडे नागरिकांचे डोळे लागले आहेत.

पानमळा येथील नितीन राऊत यांच्या दुकानात गहू आणि तांदूळ आल्याची माहिती कार्डधारकांना मिळाली. 

सकाळी दहाला दुकान सुरू होणार असले तरी आठ वाजल्यापासून दुकानाबाहेर गर्दी झाली. दुपारी दोन वाजून गेले तरी भर उन्हामध्ये डोक्‍यावर पोते, पिशवी घेऊन रांगेत जवळपास ४० ते ५० महिला, पुरूष रांगेत उभे होते. ऊन वाढल्याने रांगेत थांबलेल्या वृद्धांना लोक स्वतःहून पुढे जाऊन धान्य घेण्यास सांगत असल्याने यावेळी माणुसकीचे दर्शनही घडले.

माझ्याकडे ११०० ग्राहक आहेत. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी एप्रिल महिन्यातील दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू आले आहेत. लॉकडाऊनमुळे धान्य मिळणार की नाही या धास्तीने आज पहिल्याच दिवशी लोकांनी गर्दी केली आहे. 
- नितीन राऊत, रेशन दुकानदार

सकाळी १० वाजता रांगेत थांबल्यावर एक वाजता माझा नंबर लागला. घरात सहा लोक आहोत. आता एका महिन्याचे गहू, तांदूळ मिळाल्यामुळे थोडा आधार मिळाला आहे.
- नवनाथ कांबळे, दांडेकर पूल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: labor worker line for ration in summer