हळद रुसली... : लग्नाविनाच वाजला व्यावसायिकांचा ‘बॅण्ड’

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 April 2020

ॲडव्हान्स केला परत 
लॉकडाउनमुळे अनेकांनी विवाह रद्द केले. ॲडव्हान्स देऊन बुकिंग केलेले मंगल कार्यालयदेखील रद्द केल्याने संबंधितांना रक्कम परत करावी लागली, असे थोपटे लॉन्सचे व्यवस्थापक कैलास थोपटे यांनी सांगितले. दरम्यान, फोटोग्राफरची परिस्थितीही तशीच आहे. प्री-वेडिंग, साखरपुडा, लग्न, बारसे, वाढदिवस अशा अनेक ऑर्डर रद्द झाल्या आहेत. त्यांचे ॲडव्हान्स बुकिंगचे पैसेही परत करावे लागल्याचे फोटोग्राफर नवनाथ काजळे यांनी सांगितले.

पिंपरी - विवाह सोहळे रद्द झाल्याने केवळ वर-वधूंचीच निराशा झाली नाही. तर त्याहूनही घोर निराशा झाली, ती व्यावसायिकांची. त्यांच्याकडे रोजंदारीने काम करणाऱ्या कामगारांची. यंदा लग्नसराईत चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा बाळगणाऱ्या व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे अनेकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. व्यावसायाला लागणाऱ्या साहित्यासाठी घेतलेले कर्ज कसे फिटणार, यासारखे अनेक प्रश्न व्यावसायिकांपुढे ‘आ’ वासून उभे आहेत.  

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विवाह सोहळे मोठ्या धूमधडाक्‍यात लावले जातात. मार्च, एप्रिल, मे आणि जून हा लग्नसराईचा हंगाम आहे. त्यातही वर्षभरातील बहुतांश मुहूर्त हे एप्रिल व मेमध्येच असतात. त्यासाठी विवाहेच्छुकांच्या कुटुंबीयांना मोठी तयारी करावी लागते. मंगल कार्यालय, वऱ्हाडींसाठी वाहने, केटरर्स, बॅण्ड किंवा डीजे अशा अनेक बाबींचा त्यात समावेश आहे. मात्र, कोरोनामुळे यंदा सर्वच गोष्टींचा ताळमेळ बिघडला. लग्नसराईवर अवलंबून असलेल्या लहान-मोठ्या व्यावसायिकांचा रोजगार बुडाला. यामुळे अनेकांवर घरी बसण्याची वेळ आली. त्यात प्रामुख्याने मंगल कार्यालय, लॉन्स, फोटोग्राफी, वाजंत्री, पुरोहित, मंडप डेकोरेशन, आचारी, केटरर्स, घोडेवाले, फुलवाले, किराणा मालाचे व्यापारी, कापड व्यावसायिक, लग्नपत्रिका प्रिटिंग, ट्रॅव्हल्स आणि त्यांना मदत करणाऱ्या कामगारांना बेरोजगारीला सामोरे जावे लागत आहे. लॉन्सची देखभाल व स्वच्छता करणाऱ्या कामगारांनाही काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

विवाह सोहळ्यांसह घरगुती कार्यक्रम, साखरपुडा आदी समारंभाच्या ऑर्डर रद्द झाल्या. काहींनी समारंभाच्या तारखा बदलल्या. मात्र, सगळे कार्यक्रम रद्द केल्याने नुकसान झाले असून, आर्थिक गणित बिघडले आहे.  
- राजन शिंदे, केटरिंग व्यावसायिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maximum marriages cancel by coronavirus