Coronavirus : ‘एनएसएस’ची फौज सरसावली

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 April 2020

सॅनिटायझर व मास्क निर्मिती
विद्यार्थ्यांना सॅनिटायझर आणि मास्क तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याबाबतचे तंत्रज्ञान विद्यापीठ देणार आहे. विद्यार्थी ही उत्पादने तयार करतील आणि ती आरोग्य सेवकांना पुरविण्याची जबाबदारीसुद्धा पार पाडतील.

पुणे - ‘कोरोना’ लाॅकडाउन काळात नागरिकांना मदत पोचविण्यासाठी सरकारी यंत्रणांवर प्रचंड ताण पडत आहे. तो कमी करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठाच्या ‘राष्ट्रीय सेवा योजने’तील (एनएसएस) पुणे, नाशिक व नगर जिल्ह्यातील  60 हजार विद्यार्थी यंत्रणेला विविध माध्यमातून सहाय्य करणार आहेत, अशी माहिती कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांनी दिली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात संचारबंदीमुळे यंत्रणांना विविध कामे करण्यासाठी स्वयंसेवकांची गरज आहे. त्यामध्ये ''एनएसएस'' स्वयंसेवकांचा उपयोग कसा करून घेता येईल यावर कुलगुरू करमळकर यांनी व्यवस्थापन परिषद, अधिसभा, विद्या परिषदेच्या काही सदस्यांशी व ''एनएसएस''च्या अधिकारी यांच्याशी  टेलि-कॉन्फरन्सिंगद्वारे साधला. त्यातून हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. 

शासकीय यंत्रणेकडून ज्येष्ठ नागरिक, मजूर आदींना जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणासाठी मदत करणे. 

शासनाकडून विविध वंचित घटकांसाठी बँकांमार्फत निधी दिला जात आहे. त्यासाठी बँकांमध्ये विविध प्रकारची मदत करणे, वंचित घटकापर्यंत लाभाच्या योजना पोचविण्यासाठी मदत करणे, पोलिस ठाण्यांमध्ये किंवा त्यांच्या मदत केंद्रात पोलिस  मित्र म्हणून काम करणे, यासह महसूल यंत्रणेसोबत काम करणे, रक्तदानासाठीच्या फिरत्या व्हॅन चालवणे. 

या मोहिमेत प्रत्येक एका विद्यार्थ्याला दहा कुटुंबे जोडून दिली जाणार आहेत. त्याद्वारे सहा लाख कुटुंब आणि तब्बल 25 लाख लोकांपर्यंत हे विद्यार्थी जोडले जातील. यातून या संचारबंदीत समस्यांचे निराकरण होण्यास मदत होऊ शकेल, असा दावा विद्यापीठाने केला.

कोरोनाच्या आपत्तीशी लढत असताना विद्यापीठाने समाजात जाऊन थेट मदत करणे अपेक्षित आहे. यासाठी ठोस कार्यक्रम घेऊन आम्ही समाजात जात आहोत. यामुळे यंत्रणेवरील ताण काही प्रमाणात कमी होईल आणि समाजाला दिलासा मिळेल. 
- डाॅ. नितीन करमळकर, कुलगुरू,  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NSS support to government system work