Coronavirus : केशरी शिधापात्रिकाधारकांना मतदान केंद्रातून पोलिस बंदोबस्तात धान्यधान्यवाटप

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 April 2020

वडगाव शेरी मतदारसंघात ९०  स्वस्त धान्य दुकानदार असून प्राधान्यक्रमात नसलेली ४८ हजार ४७० शिधापत्रिकाधारकांना रेशन वितरित करायाचे आहे. त्यासाठी पोलिसांची मदत घेऊन धान्य वितरित करण्यात येणार आहे.
- प्रशांत खताळ, परिमंडल अधिकारी, ई विभाग

येरवडा - शहर व जिल्ह्यातील सर्वच केशरी शिधापात्रिकाधारकांना शाळेतील मतदान केंद्रातून पोलिस बंदोबस्तात धान्य मिळणार आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग राहणार आहे. लाभार्थ्यांना पुढील आठवड्यापासून धान्यपुरवठा केला जाईल. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व मतदान केंद्र ताब्यात घेतल्याचे समजते.  

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत एक एप्रिलपासून पात्र असलेल्या अंत्योदय व प्राधान्य कुटुंबाला गहू दोन रूपये तर तांदूळ तीन रूपये प्रति किलोने वितरण होत आहे. या व्यतिरिक्त प्रतिसदस्य प्रतिमहा पाच किलो तांदूळ वितरित होणार आहे. यासह राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार सर्वच केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळणार आहे.  त्यामुळे भारतीय अन्न महामंडळातून मोठ्या प्रमाणात आलेले धान्य दुकानात एकत्रित ठेवणे अडचणीचे ठरणार आहे. कारण यामध्ये मोफत धान्य, प्राधान्यक्रम असलेल्यांना मिळणाऱ्या धान्याचे दर कमी आहेत. तर प्राधान्यक्रम नसलेल्यांना देण्यात येणाऱ्या धान्याचे दर अधिक आहेत.  त्यामुळे परिसरातील मतदान केंद्रात दुकानदार येऊन शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण करणार आहेत.

पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये नऊ लाख ४० हजार २३० शिधापत्रिकाधारक आहेत. त्यापैकी तीन लाख कुटुंबे प्राधान्यक्रमात येतात. तर पाच लाख ४,९३१ प्राधान्यक्रम नसलेल्यांना गहू व तांदूळ मिळणार आहेत. शहरातील चाळीस टक्के पेक्षा अधिक लोकसंख्या असलेले बांधकाम मजूर, धुणी- भांडी करणाऱ्या महिला, कचरा वेचक, अशा असंघटित कामागारांना त्याचा फायदा होणार आहे.  शहर व पिंपरी-चिंचवडमध्ये शुभ्र शिधापत्रिकाधारकांची संख्या सव्वा लाख आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत त्यांना सुद्दा रेशन देण्याचा विचार सुरू असल्याचे समजते.

  • पुणे शहर व पिंपरी-चिंचवड - 11 परिमंडल कार्यालय
  • नवीन केशरी कार्डधारक लाभार्थी - ५ लाख 4 हजार 931
  • गहू प्रति व्यक्ती तीन किलो - प्रति किलो आठ रूपये
  • तांदूळ प्रति व्यक्ती दोन किलो - प्रति किलो 12 रूपये 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: orange ration card holders distribute food grains at polling booths in police bandobast