कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरीत, व्यापाऱ्यांनीच घेतला पुढाकार; वाचा सविस्तर बातमी

pimpri chinchwad camp market shut down traders took initiative awareness rally
pimpri chinchwad camp market shut down traders took initiative awareness rally

पिंपरी Coronavirus : पिंपरी कॅम्प येथील 15 ते 20 प्रमुख जागरुक व्यापाऱ्यांनी पुढाकार घेतल्याने बाजारपेठेतील बहुतांशी दुकाने गुरुवारी बंद करण्यात आली. मात्र, यावेळी काही भाडेकरु दुकानदारांनी त्यांच्याशी हुज्जत घालत आडमुठी भूमिका घेतली. त्यामुळे, व्यापाऱ्यांना महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि पोलिसांना अखेर पाचारण करावे लागले. त्यानंतर पिंपरी बाजारपेठ पूर्णपणे बंद झाली.

राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पिंपरी-चिंचवडमध्ये सापडले आहेत. त्यामुळे, महापालिकेकडून वेळोवेळी युद्धपातळीवर कोरोना प्रसार-प्रचाराबद्दल जनजागृती केली जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर, बाजारपेठेत गर्दी होऊ नये यासाठी फेडरेशन ऑफ असोसिएशन्सने बुधवारी (ता.18) आणि गुरुवारी (ता.19) किराणा माल, औषधे, भाजीपाला वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, पिंपरी कॅम्प येथील सर्व व्यापाऱ्यांनी बंदचे आवाहन झुगारुन दुकाने चालूच ठेवत शहरवासीयांचे आरोग्य धोक्‍यात आणले होते. गुरुवारी दुपारी 1 वाजेपर्यंत देखील सर्व बाजारपेठ चालूच होती. मात्र, त्यातील काही प्रमुख जुन्या आणि जाणत्या व्यापाऱ्यांनी बंदसाठी पुढाकार घेतला.

पिंपरी-चिंचवड होजिअरी ऍन्ड रेडिमेड असोसिएशनचे अध्यक्ष महेश मोटवानी, पिंपरी इलेक्‍ट्रॉनिक्‍स असोसिएशनचे देवराज सबनानी, दिलीप मदनानी, महेश अथवानी (मोबाईल), मुकेश जवाहरानी (संगणक), जयेश चौधरी, प्रकाश सिरवानी आदींनी पिंपरी कॅम्प बाजारपेठेत आर्य समाज विद्यालयाजवळ जमून व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यानुसार, अनेक व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकानांबाहेर लावल्या वस्तू काढून घेत दुकाने बंद केली. मात्र, कापड बाजारपेठेतील अनेक दुकाने भाड्याने चालविण्यास देण्यात आली आहेत. त्यामुळे, तेथील काही भाडेकरु दुकानदारांनी व्यापाऱ्यांशी हुज्जत घातली. पालिकेचे अतिरिक्त आयुक्‍तांना याबद्दल दूरध्वनीवरुन कळविले असता दोन पोलीस बाजारपेठेत दाखल झाले. थोड्या वेळातच त्यांना कॉल आल्याने ते तेथून निघून गेले. परंतु, पालिकेच्या अतिक्रमण विभाग पोलीसांसह बाजारपेठेत दाखल झाले. सुमारे 25 ते 30 कर्मचाऱ्यांचे पथकाने भाग घेत दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. तसेच दुकाने उघडल्यास कारवाई करण्याचा इशाराही पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिला.

कोरोनाच्या जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महेश मोटवानी म्हणाले, ‘कोरोनाबद्दल सर्वत्र जनजागृती केली जात आहे. मात्र, पिंपरी कॅम्प येथील काही व्यापाऱ्यांमध्ये त्याबद्दल गांभीर्य नाही. दुकानांमधील कर्मचाऱ्यांना मास्क किंवा सॅनिटायझरदेखील ठेवण्यात आलेले नाहीत. आम्ही सर्व जनतेच्या हितासाठी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. परंतु, काही दुकानदारांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे, पोलीसांना बोलाविण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. पालिकेचा अतिक्रमण विभाग आणि पोलीस पथकाचे आम्हाला मोठे सहकार्य लाभले.'

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फुलबाजार बंद ठेवण्याची मागणी होत होती. त्यानुसार, आम्ही 20, 21 आणि 22 मार्चला फुलबाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी आणि ग्राहकांनीही सामंजस्याची भूमिका घेत त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सर्व व्यापाऱ्यांनी आरोग्याबद्दल जागरुक राहून कुटूंबियांचीही काळजी घ्यावी. अनावश्‍यक बाहेर फिरु नये.

- राजकुमार मोरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड फुलबाजार आडते संघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com