Coronavirus : पिंपरी-चिंचवड उद्योगनगरी ‘लॉकडाऊन’; टाटा मोटर्स ३१ पर्यंत बंद राहणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

आकडे बोलतात...

  • ११,००० - उद्योगनगरीतील कंपन्या
  • २.५ ते ३ लाख - मनुष्यबळ 
  • १.५ लाख - परराज्यांतील कामगार (सुमारे)

 

पिंपरी - कोरोना संसर्ग वाढल्याने पिंपरी-चिंचवडमधील सर्व उद्योग रविवारपासून (ता. २२) ‘लॉकडाऊन’ करण्याचा निर्णय उद्योजकांच्या बैठकीत झाला. दरम्यान, टाटा मोटर्सच्या पिंपरी प्रकल्पातील उत्पादन २४ ते ३१ मार्च या काळात बंद राहणार आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल, संजीवकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली. तिला पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे तसेच अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सरकारच्या आदेशानुसार उद्योग बंद ठेवण्यात येत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा अधिक उद्योग बंद आहेत. साठ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त कामगार गावी गेल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. येथील लघुउद्योजकांनी शनिवारपासून (ता. २१) उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या सूचनांची तत्काळ अंमलबजावणी करण्याचा निर्णय संघटनेने  घेतला आहे. 

मोठ्या उद्योगांनी मागितली मुदत
बैठकीत काही उद्योजकांनी कंपनी बंद करण्यासाठी ४८ तासांची मुदत मागितली आहे. मात्र, संसर्ग वाढत असल्याने सरकारकडून दिलेल्या नियमांचे पालन करून उद्योग लवकरात लवकर बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri chinchwad midc lockdon by coronavirus