पिंपरी-चिंचवड महापालिकेने केले भाजी मंडईकडे दुर्लक्ष

अवधूत कुलकर्णी 
Saturday, 25 April 2020

महापालिकेच्या वतीने शहरात 46 भाजी मंडई सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले असले तरी अद्याप केवळ 19 मंडईच सुरू झाल्या आहेत. भाजीविक्रीसाठीची जागा नेहमीच्या ठिकाणाहून दूर असणे, तेथे ग्राहक येण्याबाबत विक्रेत्यांना असलेली साशंकता, उन्हात व्यवसाय केल्यास आरोग्याला उद्‌भवणारा धोका यासारख्या कारणांमुळे अन्य ठिकाणी मंडई सुरू झाल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पिंपरी - महापालिकेच्या वतीने शहरात 46 भाजी मंडई सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले असले तरी अद्याप केवळ 19 मंडईच सुरू झाल्या आहेत. भाजीविक्रीसाठीची जागा नेहमीच्या ठिकाणाहून दूर असणे, तेथे ग्राहक येण्याबाबत विक्रेत्यांना असलेली साशंकता, उन्हात व्यवसाय केल्यास आरोग्याला उद्‌भवणारा धोका यासारख्या कारणांमुळे अन्य ठिकाणी मंडई सुरू झाल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिक हातगाडी व्यावसायिक, रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या विक्रेत्यांकडून भाजी खरेदीस प्राधान्य देत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी नेहमीच्या भाजीमंडईमध्ये होणारी गर्दी रोखण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 46 ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात मंडई सुरू करण्याचे जाहीर केले. या ठिकाणी सकाळी 11 ते दुपारी चार वाजेपर्यंत भाजी विक्री करण्यास परवानगी आहे. मात्र अनेक कारणांनी अन्य मंडई अद्याप सुरू झालेल्या नाहीत. सकाळी सात ते साडेसात वाजता रस्त्यावर पोलिस नसतात. ते पाहून जे नागरिक सकाळी लवकरच दूध, ब्रेड, अंडी घेण्याच्या निमित्ताने बाहेर पडतात असे नागरिक रस्त्यात कोठे हातगाडीवर भाजीविक्रेता दिसताच लगेच दुचाकी थांबवून भाजी विकत घेताना दिसतात.

19 ठिकाणी भाजी मंडई सुरू 
ठिकाणांची नावे - दहा दिवसांपूर्वी प्राधिकरणातील नियोजित महापौर निवासस्थानासाठीचा भूखंड, चिंचवड-काळेवाडी रस्त्यावरील चितराव गणपती मंदिराजवळील तालेरा मैदान, हॉकी मैदान - पिंपरी, गावजत्रा मैदान - भोसरी, चिखली पूर्णानगरमधील सीडीसीसी ग्राऊंड, यमुनानगर येथील अण्णा भाऊ साठे अभ्यासिका केंद्र, थेरगाव येथील कैलास मंगल कार्यालय, थेरगाव वनदेवनगरमधील सर्व्हे क्रमांक 628, सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदान येथे मंडई सुरू झाल्या. त्यानंतर शनिवारी (ता. 18) सम्राट चौक-मोरवाडी, रावेतमधील डि-मार्ट शेजारील भूखंड, मासुळकर कॉलनी मंडई या ठिकाणी मंडई सुरू झाली. रविवारी (ता. 19) वाल्हेकरवाडी पोलिस चौकी, शाम आगरवाल भूखंड - इंद्रायणीनगर, जलवायुविहार - इंद्रायणीनगर, कुणाल आयकॉन रस्ता, कृष्णानगर, नवमहाराष्ट्र विद्यालय मैदान - पिंपरी आणि काळेवाडी फाटा येथील मोकळे मैदान अशा सात ठिकाणे अशी सर्व मिळून 19 ठिकाणी मंडई सुरू झाल्या आहेत. 

सुविधांचा अभाव 
तसेच वजनकाटे चार्ज करण्यासाठी इलेक्‍ट्रिसिटीची व्यवस्था नाही. शक्‍यतो सकाळी पहिल्या दोन तासात भाजी खरेदी करावी. विक्रेत्यांच्या सोयीसाठी महापालिकेच्या वतीने काही ठिकाणी पाण्याचे टॅंकर ठेवण्यात आले आहेत तर काही ठिकाणी पिण्याचे पाण्याचे नळ आहेत. खरेदी करताना ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करण्याची आवश्‍यकता आहे. मात्र काही ठिकाणी या नियमाचे पालन होताना दिसत नाही. भाजी खरेदीला जाण्यापर्यंतच्या मार्गापर्यंतच या नियमाचे पालन होताना दिसते. प्रत्यक्ष भाजी खरेदी करताना अनेक ग्राहक शेजारी-शेजारी उभे राहून खरेदी करताना दिसत होते. 

ठळक मुद्दे 
* रस्त्याच्या कडेला, हातगाडी विक्रेत्यांकडून भाजी खरेदी सुरूच 
* अनेक मंडईंमध्ये शौचालयाचा अभाव 
* वजनकाट्यांच्या चार्जिंगसाठी विद्युतपुरवठ्याच्या सोईचा अभाव 
* ग्राहकांनी मंडईमधील विक्रेत्यांकडूनच भाजी खरेदी करावी 

या दिवसात भाज्या कोणत्या खाव्यात 
उन्हाळ्यात शरीरात पाणी टिकवून ठेवावे लागते. त्यामुळे ज्या भाज्या पातळ स्वरूपात खाता येऊ शकतात, अशा सर्व भाज्या खाण्यास प्राधान्य द्यावे. तसेच कलिंगड, खरबूज, द्राक्ष यासारखी फळे खावीत. 
- डॉ. वर्षा डांगे, महिला वैद्यकीय अधिकारी, महापालिका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri Chinchwad Municipal Corporation neglected vegetable market