Coronavirus : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा लढा ‘वॉर रूम’मधूनही

पीतांबर लोहार
Sunday, 19 April 2020

मोबाईल ॲपचा फायदा 
पीसीएमसी स्मार्ट सारथी ॲप विकसित केले आहे. एका क्‍लिकवर घराजवळील मेडिकल, किराणा दुकाने, भाजीपाला केंद्रे, एटीएम सेंटर, घरपोच सेवा देणारी दुकाने, रात्रनिवारा, अन्नछत्र आदींची माहिती उपलब्ध आहे. तसेच रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सेवा पुरविणे आणि त्याचवेळी नागरिकांना जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करणे अशा बिकट परिस्थितीत सुविधा देण्यास मदत होत आहे. हे ॲप १६ हजार नागरिकांनी डाऊनलोड केले आहे. या माध्यमातून अठराशे स्वयंसेवक काम करीत आहेत. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयानुसार एक टीम कार्यरत आहे.

पिंपरी - तुम्ही विनाकारण घराबाहेर पडलात..., मॉर्निंग वा इव्हिनिंग वॉक करताय..., लॉकडाउन व संचारबंदी आदेशाचा भंग केलाय..., तर खबरदार. तुमच्या प्रत्येक हालचालीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे आणि ठेवली जातेय महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी तयार केलेल्या ‘वॉर रूम’मधून. इतकेच नव्हे तर, कोरोना विषयीचे दैनंदिन अपडेटही ‘वॉर रूम’च्या माध्यमातून तुमच्या पर्यंत पोचविले जात आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने फेब्रुवारीपासूनच तयारी सुरू केली होती. वायसीएममध्ये आयसोलेशन कक्ष उभारला होता. जोडीला भोसरीतील नवीन रुग्णालयात यंत्रणा सज्ज ठेवली होती. प्रत्यक्षात अकरा मार्चला पहिले तीन रुग्ण दाखल झाले आणि त्यांचे पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडील (एनआयव्ही) रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यानंतर महापालिका यंत्रणा अधिक वेगाने कामाला लागली. 
त्याचाच एक भाग म्हणून स्मार्ट सिटी अंतर्गत ‘वॉर रूम’ उभारण्यात आली आहे.

महापालिकेच्या पीसीएमसी स्मार्ट सारथी ॲपवर कोरोनासंदर्भात सेल्फ असेसमेंट सर्व्हे प्रसिद्ध केला आहे. सर्व नागरिकांनी ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी ॲप’ डाऊनलोड करावे आणि ‘सेल्फ असेसमेंट सर्व्हे’ भरावा. या माध्यमातून घरबसल्या शंका निरसन होईल. तसेच महापालिकेलाही नागरिकांची योग्य माहिती मिळेल.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका

वॉर रूमचे फायदे

  • शहरातील ८४ ठिकाणी बसविलेल्या २७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा नियंत्रण कक्ष
  • सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांच्या मदतीने त्वरित कार्यवाही 
  • लॉकडाउन व संचारबंदीच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांवर लक्ष 
  • कोरोना पॉझिटिव्ह, निगेटिव्ह रिपोर्टसह रोजचे अपडेट उपलब्ध
  • एकूण रुग्णांची संख्या, रुग्णालयात क्‍वारंटाइन व होम क्वारंटाइन संख्या
  •     रुग्णालयनिहाय रुग्णांची संख्या अशी सर्व माहिती डॅशबोर्डवर उपलब्ध

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri-Chinchwad Municipal Corporation war from the war room