Video : माॅर्निग वाॅकला गेले; मग पोलिसांनी...

गणेश बोरुडे 
Wednesday, 22 April 2020

- तळेगावात भल्या सकाळीच पोलिसांची कारवाई

तळेगाव स्टेशन : कोरोना लाॅकडाऊन दरम्यान माॅर्निग वाॅकसाठी फिरणाऱ्या तळेगाव स्टेशन विभागातील शंभरहून अधिक बेफिकीर नागरिकांवर उठाबशा काढण्याची वेळ आली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तळेगाव दाभाडे पोलिसांनी बुधवारी (ता.२२) भल्या सकाळीच मोठी कारवाई केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप गाडीलकर यांच्यासह दहा पोलिसांच्या पथकाने सकाळी साडेसहाच्या सुमारास ही कारवाई केली. या बेफिकीर नागरिकांना पोलिसांनी एक तास उभे ठेऊन नंतर उठाबशा आणि व्यायाम प्रकार करवून घेतले. विशेष म्हणजे पकडलेल्यांपैकी काहींना सोडून द्यावे म्हणून लगेच राजकीय व्यक्तींचे फोन यायला सुरुवात झाली.

मात्र, पोलिसांनी त्यांना न जुमानता कायदा मोडणाऱ्यांना ही अद्दल घडवली. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री करीत असलेल्या आवाहनाला लोकांनी प्रतिसाद देऊन घरातच बसावे, अशी विनंती करुन पोलिस उपनिरीक्षक गाडीलकर यांनी या बेफिकीर नागरिकांची चांगली कानउघाडणी केली.

तळेगावात सर्व अत्यावश्यक सेवेची दुकाने फक्त सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंतच चालू ठेवावीत. कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नये. माॅर्निग वाॅक तसेच सोसायटीच्या आवारात फिरु नये. यापुढेही अशीच कडक कारवाई चालू राहणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिली. तसेच तळेगाव आणि स्टेशन परिसरात केवळ एकच रस्ता रहदारीसाठी खुला ठेवल्यामुळे नागरिकांच्या फिरण्याला बऱ्यापैकी पायबंद बसला आहे, असेही वाघमोडे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Took Action against who break Law of Lock Down