आरे देवा! क्वारंटाइन केलेल्या नागरिकांचे होत आहेत हाल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 April 2020

घरासमोरील कुटुंब कोरोनाबाधित सापडल्याने आम्हाला वडगावमधील सिंहगड कॉलेजमध्ये हलविले. पण तेथे ना स्वच्छता आहे, ना पुरेशा जेवणाची व्यवस्था. काल तर खराब झालेले (आमलेले) जेवण देण्यात आले...

पुणे - घरासमोरील कुटुंब कोरोनाबाधित सापडल्याने आम्हाला वडगावमधील सिंहगड कॉलेजमध्ये हलविले. पण तेथे ना स्वच्छता आहे, ना पुरेशा जेवणाची व्यवस्था. काल तर खराब झालेले (आमलेले) जेवण देण्यात आले...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बालगंधर्व रंगमंदिर येथे बॅकस्टेज कलाकार म्हणून काम करणाऱ्या व सध्या क्वारंटाइन केलेल्या एका कलाकाराची ही व्यथा आहे. ते शिवाजीनगर परिसरात राहतात. परंतु त्यांच्या घरासमोरील कुटुंबातील काहीजण कोरोनाबाधित झाल्याने त्यांचे आणि त्यांच्या शेजारची दोन कुटुंबांना गेल्या आठ दिवसांपासून वडगाव बुद्रूक येथील सिंहगड कॉलेज परिसरातील पन्हाळा हॉस्टेल येथे क्वारंटाइन करण्यात आले आहे.

‘सकाळ’ने या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला. ते  म्हणाले, ‘‘आमचे येथे जेवणाचे हाल सुरू आहेत. आमलेले जेवण येते. काल रात्री तर बारा वाजता काही तरुणांनी आम्हाला जेवण बनवून दिले. गेली आठ दिवस आम्ही ज्या खोलीत राहत आहोत, तिथे झाडूसुद्धा मारायला कोणी आलेले नाही. चहा, नाश्‍ता, जेवण घ्यायला खाली एका खोलीत बोलावतात. तेथे रांग लावून ते घ्यावे लागते. त्यात कोण कोरोना पॉझिटिव्ह आहे का, निगेटिव्ह आहे, हेही कळत नाही.’’

प्रशासनाने याची दखल घ्यावी; अन्यथा गर्दीमुळे जे बाधित नाहीत, त्यांनासुद्धा लागण होण्याची शक्‍यता आहे. आम्ही सुमारे दोनशे लोक या ठिकाणी आहोत, त्यात वृद्धांची संख्या बरीच आहे. त्यांनी मोठा धोका असल्याची चिंताही त्यांनी 
व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Quarantined citizens are in problem