coronavirus: संगीताला "ऑनलाइन कॉन्सर्ट'चे कोंदण 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 April 2020

कोरोनाच्या प्रभावानंतर जगातील सर्व क्षेत्रात उलथापालथ होईल,त्याला संगीत क्षेत्रही अपवाद नाही.या बदलामध्ये संगीतालाही "ऑनलाइन कॉन्सर्ट'चे कोंदण मिळेल आणि गायकांना वैश्विक संगीतमंचाचे अवकाश खुले होईल.

पुणे - कोरोनाच्या प्रभावानंतर जगातील सर्व क्षेत्रात उलथापालथ होईल, त्याला संगीत क्षेत्रही अपवाद राहणार नाही. या बदलामध्ये संगीतालाही "ऑनलाइन कॉन्सर्ट'चे कोंदण मिळेल आणि गायकांना वैश्विक संगीतमंचाचे अवकाश खुले होईल... 

कोरोनानंतर संगीत क्षेत्राचे भवितव्य कसे असेल, या विषयी "सकाळ'ने गायक, कलाकारांशी संवाद साधला. त्यात अनेकांनी ऑनलाइन अर्थात इंटरनेटच्या माध्यमातून संगीताचे नवे प्रवाह रसिकांभोवती फेर धरतील आणि हिंदुस्थानी शास्त्रीय-उपशास्त्रीय आणि सुगम संगीतही वैश्विक स्तरावर गुंजत राहील, अशी भावना व्यक्त केली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गायिका अंजली मराठे म्हणाली, ""संगीत क्षेत्राला पूर्वपदावर यायला थोडा वेळ लागेल. यापुढे आर्थिक अडचणी वाढतील; पण संगीत ही गरज असेलच. सोशल मीडियामुळे संगीत क्षेत्राचे स्वरूप बदलत आहे. या मीडियाचा आवाका मोठा आहे. त्यातून आपण खूप जास्त लोकांपर्यंत पोचू शकतो. कोरोनानंतर हीच पद्धत रूढ होऊ शकते. "ऑनलाइव्ह लाइव्ह कॉंन्सर्ट'चे युगही प्रस्थापित होईल. लोक पैसे देऊन ऑनलाइन मैफलींचा आस्वाद घेऊ लागतील.'' 

आणखी वाचा - उद्धवजी लोकांचे जीव वाचवा आणि जगण्याची साधनंही

शास्त्रीय गायक पं. यादवराज फड म्हणाले, ""चित्रपटगृहातील पडदा टीव्हीच्या रूपाने आपल्या घरात कधी आला, हे समजलेही नाही. तसेच संगीताच्या मैफली या इंटरनेटद्वारे आपल्या घराचत होऊ लागतील. संगीतातील कलाकाराला वैश्विक होणे सोपे होईल. यातून कलाकारला आर्थिक लाभ किती होईल हे आताच सांगता येणार नाही; पण या क्षेत्रात मोठे बदल होईल, यात शंका नाही.'' 

शास्त्रीय गायिका सानिया पाटणकर यांनी सांगितले की, कोरोनानंतरच्या काळात शास्त्रीय संगीताच्या मांडणीमध्ये, वेळेच्या बंधनात काही फरक होईल का, हे काळच ठरवेल. अर्थात मैफलींमध्ये श्रोते आणि कलाकार यामध्ये जो प्रत्यक्ष सांगीतिक संवाद घडून नवनिर्मिती होते, ती होणार का असाही प्रश्न आहे.'' 

कोरोनामुळे "ऑनलाइन कॉन्सर्ट'चा ट्रेंड येऊ लागला आहे. मनुष्य जीवन, आर्थिक, सामाजिक सर्वच स्तरांवर बदल होणार आहेत. त्याबरोबर संगीत क्षेत्रातही बदल होऊ शकतात. कोरोनानंतरच्या काळात काही मोठे संगीत महोत्सवही ऑनलाइन होऊ शकतील. कदाचित ऑनलाइन ऐकणाऱ्या श्रोत्यांची संख्याही वाढू शकेल आणि आर्थिक गणिते बदलू शकतील. 
-सानिया पाटणकर, शास्त्रीय गायिका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: reaction singer, artist about the future of the music sector