जैव वैद्यकीय कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या महापालिकेला सूचना 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 April 2020

कोरोनासंशयित रुग्ण तसेच बाधितांवर होत असलेल्या उपचारादरम्यान तयार झालेल्या जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावली जाणार आहे.

पिंपरी - कोरोनासंशयित रुग्ण तसेच बाधितांवर होत असलेल्या उपचारादरम्यान तयार झालेल्या जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावली जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने वैद्यकीय आणि आरोग्य विभागांना मार्गदर्शक सूचना पाठवल्या आहेत. अशी साथ पुन्हा पसरू नये, हा या मागील उद्देश आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

क्वारंटाइन व आयसोलेशन कक्ष, कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारादरम्यान निर्माण होणारा जैव वैद्यकीय कचऱ्याचे संकलन, वाहतूक व विल्हेवाट लावताना खबरदारी घेण्याची सूचना मंडळाने केली आहे. सध्या डॉक्‍टर, नर्स व अन्य रुग्णालयीन कर्मचारी यांनाही संसर्ग होण्याचे धोके वाढले आहेत. त्यासाठी सीबीडब्लूटीएफने (कॉमन बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटी) जैव वैद्यकीय कचरा 48 तासांच्या आत उचलून त्याची विल्हेवाट करणे बंधनकारक राहील, असे केंद्रीय व राज्य प्रदूषण मंडळांना सूचित केले आहे. 

coronavirus : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रबोधन 

अशा आहेत मार्गदर्शक सूचना 
- आरोग्य कर्मचारी, नागरिक, प्रयोगशाळा कर्मचारी, क्वारंटाइन, आयसोलेशन कक्षात वापरलेले फेसमास्क, हातमोजे आणि इतर संरक्षक उपकरणे स्वतंत्रपणे पिवळ्या प्लॅस्टिक बॅगमध्ये संकलित केली जातील व त्याला बायोहजार्ड चिन्हासह त्यावर "कोविड 19 कचरा' असे चिन्हांकन केले जाईल. 
- उपचारादरम्यान निर्माण झालेला व पिवळ्या बॅगमध्ये संकलन केलेल्या कचऱ्यावर जंतुनाशक फवारणी करून तो पिवळ्या पिशव्यांमधून कचरा सामान्य प्रक्रिया सुविधा ऑपरेटरच्या ताब्यात जाईल. तो सामान्य जैव वैद्यकीय प्रक्रिया सुविधा येथे नेला जाईल. त्याचे रेकॉर्ड ठेवून दैनंदिन अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला जाईल. 
- क्वारंटाइन व्यक्ती, आयसोलेशन वॉर्डमधील कचरा काळ्या पिशव्यांमधून जमा करून त्याचे निर्जंतुकीकरण केले जाईल. 
- घनकचरा बंद गाड्यांमधून लॅंडफील साइटवर पोचविला जाईल व प्रत्येक खेपेनंतर गाडीचे निर्जंतुकीकरण केले जाईल. 
- लॅंडफील साइटवर दोन मीटर बाय एक मीटर बाय एक मीटर आकाराचा खड्डा खोदून त्याचा पृष्ठभाग सोडिअम हायपोक्‍लोराइटने फवारणी करावा. त्यात कचरा पसरविल्यानंतर त्यावर माती पसरवावी. 
- पिवळ्या व काळ्या पिशव्यांमधील कचरा संकलन, वाहतूक व विल्हेवाट लावणाऱ्या कर्मचाऱ्यांना पर्सनल प्रोटेक्‍टिव्ह इक्विपमेंट, संरक्षणात्मक साधने, जंतुनाशक फवारणीसाठी लागणारी साधने पुरविणे बंधनकारक. 

सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जैव वैद्यकीय कचरा संकलन केले जात आहे. शास्त्रोक्त पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली जात आहे. त्यासाठी स्वतंत्र एजन्सी नियुक्त केली आहे. 
- डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Scientific disposal of bio-medical waste